मुंबई,11 मार्च: राज्यसभेची एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. चौथ्या जागेसाठी अजूनही काँग्रेस आग्रही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्यसभेसाठी अर्ज भरणार आहेत. शरद पवार अर्ज दाखल करण्यासाठी विधानभवनात पोहोचले आहेत. शरद पवार यांच्यासोबत प्रफुल पटेल यांच्यासह अनेक नेतेही आहेत.
चौथ्या जागेबाबत समन्वय समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. त्यामुळे आज फौजिया खान यांची अर्ज दाखल करण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. सत्ता स्थापन झाल्यानंतर आता राज्यसभेची गणितही बदलण्याची शक्यता आहे. राज्यसभेच्या चौथ्या जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडी होते की काय, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
हेही वाचा..अखेर ‘कमल’नाथ सोडून कमळ घेतलं हाती, ज्योतिरादित्य शिंदेंचा भाजप प्रवेश
राज्यसभेच्या 55 जागांसाठी येत्या 26 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. त्याच दिवशी त्याची मतमोजणी होणार आहे. राज्यात एकूण सात जागांसाठी निवडणूक होत असून विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या चार आणि भाजपच्या तीन जागा निवडून येऊ शकतात. दुसरीकडे, तामिळनाडूत 6 जागा, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील प्रत्येकी 5 जागांवर निवडणूक होत आहे. ओडिशा, आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या चार जागांसाठी मतदान होईल. तर आसाम आणि राजस्थानमधून 3 जागा रिक्त होत आहेत.
महाविकास आघाडीच्या वाट्याला राज्यसभेच्या 4 जागा आल्या आहेत. आघाडीतील तीन पक्षांना त्यापैकी प्रत्येकी एक जागा मिळणार आहे. तर उर्वरित एका जागेसाठी तिन्ही पक्षांमध्ये चढाओढ निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपकडून रिपइंचे नेते रामदास आठवले यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे. राज्यसभेच्या चार जागांमधील दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि फौजिया खान यांना देण्याचे राष्ट्रवादीने निश्विच केल्याचे समजते. तसे झाल्यास शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येक एक जागा मिळणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत मतभेद होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा.. धोका वाढला! भारतात 'कोरोना'चे आणखी 10 रुग्ण, व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या 60 वर पोहोचली
त्यामुळे राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी आज काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राज्यसभेच्या उर्वरित चौथ्या जागेबाबात महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका मांडली. तसेच काँग्रेसमध्ये रजनी पाटील, राजीव सातव आणि मुकुल वासनिक यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, यामधील उमेदवार पक्षाध्यक्षा सोनिया गांधी ठरवणार असून त्याची घोषणा बुधवारी होणार असल्याचेही थोरात यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.