जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शरद पवारांच्या भूमिकेवर PM मोदींकडून टीका, अजित पवारांनी दिलं रोखठोक उत्तर

शरद पवारांच्या भूमिकेवर PM मोदींकडून टीका, अजित पवारांनी दिलं रोखठोक उत्तर

शरद पवारांच्या भूमिकेवर PM मोदींकडून टीका, अजित पवारांनी दिलं रोखठोक उत्तर

कृषी कायद्यावरून भूमिका बदलल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

अमरावती, 8 फेब्रुवारी : कृषी कायद्यावरून देशभरातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघत आहे. पंजाब, हरियाणासह देशाच्या विविध भागातील शेतकरी या कायद्याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे आज संसदेतही हाच मुद्दा गाजला. मात्र याच कायद्यावरून भूमिका बदलल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केला आहे. शरद पवार यांनी यू टर्न घेतला असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केला. यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ‘ज्या ठिकाणी शेतमालाचे भाव आधारभूत किमतीपेक्षा कमी असतील तर त्यात केंद्राने सुधारणा करावी असं पवार साहेबांचं मत होतं. शरद पवार हे नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूनेच विचार करत आलेले आहे. म्हणूनच शरद पवार साहेबांना शेतकऱ्यांचे नेते म्हटले जाते,’ असं म्हणत अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. हेही वाचा - पंतप्रधान मोदींनी दिलं शेतकरी आंदोलकांना चर्चेचं निमंत्रण; म्हणाले, MSP कायम राहणार! ‘आताचं सरकार हे शेतकऱ्यांचं ऐकून घ्यायलाही तयार नाही. दिल्ली येथे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. सरकार त्या ठिकाणी खिळे ठोकून शेतकऱ्यांना अटकाव करत आहे. ही काय देशात मोगलाई लागली काय?’ असा सवाल करत अजित पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणाही साधला आहे. अमित शहांचा शिवसेनेवर हल्लाबोल, अजित पवार काय म्हणाले? भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले असता त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. ‘महाराष्ट्रातील जनतेने भाजप व शिवेसेनेला जनादेश दिला. मात्र शिवसेनेने सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. आम्ही कोणतीही गोष्ट बंद खोलीत करत नाही, शिवसेनेला कोणतंही आश्वासन आम्ही दिलं नव्हतं,’ असा दावा करत अमित शहा यांनी शिवसेनेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. यावर बोलताना अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत तिरकस भाष्य केलं आहे. ‘जेव्हा भाजप शिवसेनेची बंद खोलीत चर्चा झाली, तेव्हा आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी दोघेही त्यांच्या खोलीत नव्हतो. त्यामुळे काय चर्चा झाली हे त्या दोघांनाच माहीत आहे,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात