मुंबई, 23 फेब्रुवारी : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आले आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. विधानसभा निवडणुकीला अद्याप एक ते दीड वर्ष बाकी आहे. मात्र आतापासूनच महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोण यावरून राष्ट्रवादीमध्ये शर्यत सुरू झाल्याचं चित्र आहे. यामध्ये सुप्रिया सुळे, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.
समर्थकांकडून पोस्टरबाजी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर सुप्रिया सुळे समर्थकांनी जोरदार पोस्टरबाजी केल्याचं पहायला मिळत आहे. सुप्रिया सुळे याच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री असे पोस्टर समर्थकांकडून लावण्यात आले आहेत. दोनच दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या समर्थकांकडून त्यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले पोस्टर लावण्यात आले होते. तर जयंत पाटील यांच्या समर्थकांनीही जयंत पाटील यांच्या नावाचे पोस्टर लावले होते. त्यामुळे राष्ट्रवादीत मुख्यमंत्रीपदासाठी अनेक जण दावेदार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
हेही वाचा : मशाल चिन्हाबाबत समता पक्षाचा मोठा निर्णय; ठाकरे गटाला दिलासा मिळणार?
अजित पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
दरम्यान या सर्वांमध्ये राष्ट्रवादीचे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार म्हणून अजित पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आदेश देताना कामाला लागा आपल्याला अजित पवार यांना मुख्यमंत्री बनवायचे आहे, असं म्हटलं होतं. त्यानंतर अजित पवार यांचं नाव चागलंच चर्चेत आलं. अजित पवार यांच्यानंतर आता मुख्यमंत्रीपदासाठी सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांची नाव देखील चर्चेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Chief minister, NCP, Sharad Pawar