मुंबई, 5 जुलै : अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत फूट पडल्याचं बोललं जात होतं, पण आता अजित पवारांनी बंड नव्हे, तर पूर्ण राष्ट्रवादी पक्षावर दावा ठोकल्याचं समोर आलंय. एवढच नाही तर त्यांनी आपली राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचंही निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात म्हणलं आहे. याबाबत अजित पवारांनी 30 जूनलाच निवडणूक आयोगात याचिका दाखल केल्याचं समोर आलंय, त्यामुळे आता राष्ट्रवादी कुणाची? हा वाद निवडणूक आयोगात पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस, जे ठाकरेंच्या शिवसेनेबाबत घडलं, आता तसंच काहीसं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही घडतंय. एक वर्षाआधी महाराष्ट्राने एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंमध्ये जी राजकीय रस्सीखेच पाहिली, तशीच काही स्थिती आता राष्ट्रवादी पक्षावरुन अजित पवार आणि शरद पवारांमध्ये सुरु झाल्याचं चित्र आहे. भाजपसोबत जायचं चार वेळा ठरलं, प्रत्येकवेळी काय झालं? अजित पवारांनी बॉम्ब फोडले! शिवसेना फुटीची जी स्क्रिप्ट होती, तशीच काहीशी राष्ट्रवादीतील बंडातही दिसून येतेय.. पण, यावेळी अजित पवारांनी बंड करताना जरा विशेष काळजी घेतल्याचं पाहायला मिळतंय. कारण, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याच्या दोन दिवस आधी, म्हणजे 30 जूनलाच अजित पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून थेट राष्ट्रवादीवर दावा केल्याचं समोर आलंय. खरंतर शिवसेनेतील बंडानंतर शिवसेना कुणाचा हा वाद बराच रंगला होता, त्यानंतर हा वाद निवडणूक आयोगाला गेला आणि तब्बल 9 महिन्यांनंतर निवडणूक आयोगाचा निकाल आला.. पण, अजित पवारांनी राजकीय चाणाक्षपणा दाखवत 40 आमदारांच्या सह्यांनिशी आधीच निवडणूक आयोगाला पत्र पाठवत राष्ट्रवादी पक्षावर दावा ठोकला. अजित पवारांच्या या खेळीवर शरद पवारांच्या समर्थक आमदारांनी जोरदार हल्ला चढवलाय. दुसरीकडे शरद पवारांनी मात्र राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह जावू देणार नाही, असं म्हणत अजित पवारांना आव्हान देण्याची तयारी केली आहे. एकंदरीतच, शिवसेनेनंतर राष्ट्रवादी पक्षातही पॉवरगेम सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवारांच्या पत्रामुळे हा वाद आता निवडणूक आयोगात गेलाय, त्यामुळे काका-पुतण्याच्या या संघर्षात निवडणूक आयोग कुणाच्या बाजूनं निर्णय घेतं? अजित पवार की शरद पवार, राष्ट्रवादी पक्ष कुणाला मिळतो? याकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलंय. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी किती जागांवर लढणार? अजितदादांनी सांगितला आकडा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







