नाशिक, 26 मार्च : आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मालेगावमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून केलेल्या उठावानंतर मालेगावात ठाकरे गटाची ही पहिलीच सभा आहे. विशेष म्हणजे मालेगावचे आमदार मंत्री दादा भुसे हे देखील शिंदे गटात आहेत. त्यामुळे या सभेला महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र सभेपूर्वीच मालेगावात ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर मालेगावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिसांच्या सूचनेनंतरही राऊत भूमिकेवर ठाम
आज मालेगावमध्ये उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. मात्र सभेपूर्वी शिंदे गट आणि ठाकरे गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचं वातावरण पहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांना रॅलीचा मार्ग बदलण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. मात्र पोलिसांनी जरी मार्ग बदलण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी देखील आम्ही त्याच मार्गाने येणार असल्याचं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे काय बोलणार?
उद्धव ठाकरे यांची ही सभा अपेक्षेप्रमाणे वादळी ठरण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या या सभेचा एक ट्रीझर देखील जारी करण्यात आला होता. या टीझरमधून शिंदे गटावर निशाणा साधतानाच अद्वत हिरे यांच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले होते. तसेच संजय राऊत यांनी देखील अनेकदा या सभेच्या पार्श्वभूमीवर विरोधकांवर टीका केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Malegaon, Nashik, Sanjay raut, Shiv sena, Uddhav Thackeray