नागपूर, 2 मे: राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील रुग्णांची संख्या वाढीसाठी काही ‘हॉटस्पॉट’ कारणीभूत ठरले आहेत. शहरातून कोरोना हद्दपार करण्यासाठी आता मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून ‘मास्टर प्लान’ तयार करण्यात आला आहे. या ‘मास्टर प्लॉन’नुसार ‘हॉटस्पॉट’मधील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. सर्वांचे कोरोना ‘स्वॅब’ घेतले जात आहे. सतरंजीपुरा भागात आतापर्यंत 1700 पेक्षा जास्त जणांना ‘क्वारंटाईन’ करून मनपाच्या ‘कोविड केअर सेंटर’मध्ये आणण्यात आले आहे. हेही वाचा.. आता हेच बाकी होतं.. गावी जाण्यासाठी आतुर असणाऱ्या कामगारांची होतेय लूट! आजघडीला शहरात कोरोनाचे 134 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यापैकी बहुतांशी रुग्ण हे सतरंजीपुरा भागातीलच आहेत. त्यामुळे या भागातील कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न मनपातर्फे केले जात आहेत. सतरंजीपुरा परिसरात एका कोरोनाबाधित व्यक्तीमुळे कोरोनाच्या संसर्गाची मोठी साखळी निर्माण झाली. ही साखळी खंडीत करण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्ण राहत असलेल्या परिसरातील 280 घरांमधील 1700 पेक्षा जास्त लोकांना ‘क्वारंटाईन’ करून त्यांना मनपाच्या ‘कोविड केअर सेंटर’मध्ये दाखल करण्यात आले आहे. यासर्वांचे ‘स्वॅब’ घेण्याचे काम सुरू आहे. ‘स्वॅब’ पॉझिटिव्ह येणा-या रुग्णावर जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचारही सुरू आहेत. हेही वाचा.. खायला काही नाही, यायचं कसं? हरियाणामध्ये अडकली नगरमधील 350 तरुण! सतरंजीपुरा परिसर नागपुरसाठी कोरोनाच्या दृष्टीने हॉटस्पॉट ठरला आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेची चमू दररोज या परिसरात सर्व्हेक्षण करीत आहे. नागरिकांना त्यांची इत्यंभूत माहिती विचारत आहेत. परंतु अद्यापही नागरिक संपूर्ण माहिती देत नसल्याची बाब सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून समोर आली आहे. कोरोनामुळे मृत पावलेल्या नागरिकांच्या संपर्कातील सुमारे 200 च्या वर नागरिकांनीही अशीच माहिती लपवली होती. त्यांना वेळीच विलगीकरण कक्षात पाठविल्याने मोठा संसर्ग टळला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी खरी माहिती लपविली तर तेथून अनेक नागरिक पॉझिटिव्ह निघू शकतात. येथील नागरिकांना तातडीने विलगीकरण कक्षात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







