मुंबई, 10 सप्टेंबर : आगामी मुंबई महानगरपालिकेची (BMC election 2022) निवडणूक सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मुंबई मनपासाठी (Mumbai Municipal Corporation) सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. सप्टेंबरमध्ये राज्यातील मनपाच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. आरक्षण जाहीर झालेलं असून इच्छुक कामाला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी CNN-News18 च्या कार्यक्रमात पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका करत युती तोडण्यालाही तेच जबाबदार असल्याचे सांगितले. काय म्हणाले फडणवीस? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना युती तुटण्यावर प्रश्न विचारला असता त्यांनी यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरले. ते म्हणाले, की जेव्हा महत्त्वकांक्षा क्षमतांपेक्षा जास्त असते, तेव्हा लोक निर्णय घेतात. आम्ही युतीवर लढलो होतो. जेव्हा आम्ही प्रत्येक सभेत युती करून लढलो, तेव्हा पंतप्रधान, गृहमंत्री, भाजप अध्यक्ष हे सर्व म्हणाले होते की मुख्यमंत्री भाजपचा होणार. त्यावेळई उद्धव ठाकरे देखील मंचावर होते आणि त्यांनी टाळ्याही वाजवल्या. तेच नंतर मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसले. त्यामुळे युती आम्ही नाहीतर ठाकरेंमुळे तुटली असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. ठाकरे म्हणत होते आमचं सरकार पाडून दाखवा. त्यावेळी मी सहज म्हणालो होतो, सरकार पडेल तेव्हा कळणार देखील नाही. आणि झालेही तसेच. त्यांच्या पक्षातील 40 आमदार त्यांना सोडून गेले. त्यांना कळलेही नाही. वाचा - तुम्ही या सरकारमागचे चाणक्य आहात का? क्षणभर थांबून देवेंद्र फडणवीसांनी दिलं हे उत्तर माझं डिमोशन नाही.. फडणवीस सर्वांना देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असं वाटत असताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे झाले? याबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले, की हा पक्षाचा निर्णय होता. पक्ष जो आदेश देईल तो मानणारा मी कार्यकर्ता आहे. माझा विश्वास आहे की फक्त विरोधी पक्षांनीच मला कमी लेखण्याचा प्रयत्न केला. माझा पक्ष आणि नेते माझ्या मागे होते. आम्ही जनादेश घेऊन आलो आहे. ‘आम्ही राजकीय पक्ष, फायदा तर घेणारच’ “शिवसेनेच्या आमदारांना शिवसेनेच्या जीवावर काँग्रेस-राष्ट्रवादी मजबूत होताना दिसत होती. अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा आम्ही तर राजकीय पक्ष आहोत. त्याचा फायदा तर घेणारच. तो फायदा आम्ही घेतला. पण हे जे काही घडलं ते एका दिवसात नाही घडलं. बऱ्याच कालावधीत हे सगळं घडलं. त्यांच्यासोबत अन्याय झाला. तो अन्याय झाल्यानंतर सर्व आमदार आमच्यासोबत आले”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.