मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

तुम्ही या सरकारमागचे चाणक्य आहात का? क्षणभर थांबून देवेंद्र फडणवीसांनी दिलं हे उत्तर

तुम्ही या सरकारमागचे चाणक्य आहात का? क्षणभर थांबून देवेंद्र फडणवीसांनी दिलं हे उत्तर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वातील हे सरकार स्थापन होण्यात नेमका कुणाचा हात आहे? किंवा हे सरकार स्थापन करणारे चाणक्य कोण? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला तेव्हा क्षणभर थांबून फडणवीसांनी उत्तर दिलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Chetan Patil

मुंबई, 10 सप्टेंबर : राज्यात दोन महिन्यांपूर्वी मोठा राजकीय भूकंप घडला होता. शिवसेनेचे जवळपास 40 आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत हातमिळवणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या सर्व आमदारांचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं आणि शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री बनले आणि फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वातील हे सरकार स्थापन होण्यात नेमका कुणाचा हात आहे? किंवा हे सरकार स्थापन करणारे चाणक्य कोण? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी क्षणभर थांबून उत्तर दिलं. यावेळी त्यांनी दिलेलं उत्तर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावणारं आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीमागे उद्धव ठाकरे हेच असल्याचं विधान त्यांनी केलं. न्यूज 18 च्या 'टाऊनशीप' या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

"मी चाणक्य वगैरे नाही. पण जे काही घडलंय त्यामध्ये माझी देखील काहीशी भूमिका होती. यामध्ये आमच्या केंद्रीय नेत्यांची देखील साथ मिळाली. विशेषत: गृहमंत्री अमित शाह ताकदीने आमच्या पाठीमागे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आशीर्वाद होताच. पण या अशाप्रकारच्या रणनीतीमध्ये सहभागी होत नाहीत. त्यांचा पाठिंबा आम्हाला होता", असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

(फडणवीसांना उपमुख्यमंत्रिपद घ्यावं लागलं तेव्हा नेमकं काय झालं?)

"जी लोकं आमच्यासोबत आली ते मानतात की मोदींच्या नेतृत्वातच देश पुढे जावू शकतो. त्यामुळे सर्वजण आमच्यासोबत आले. चाणक्य वगैरे सोडा. पण या परिवर्तनसाठी कोण जबाबदार आहे? असं विचारलंत तर मी उत्तर देईन - उद्धव ठाकरे. त्याचं क्रेडीट उद्धव ठाकरे यांनाच जाईल. कारण त्यांनी आमच्यासोबत युती तोडली नसती, पोकळ सरकार स्थापन केलं नसतं, ते चालवलं नसतं तर आज जे घडलंय ते काहीच घडलं नसतं. त्यामुळे आजच्या परिस्थितीला खरे जबाबदार तर उद्धव ठाकरे हेच आहेत", अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

'आम्ही राजकीय पक्ष, फायदा तर घेणारच'

"शिवसेनेच्या आमदारांना शिवसेनेच्या जीवावर काँग्रेस-राष्ट्रवादी मजबूत होताना दिसत होती. अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा आम्ही तर राजकीय पक्ष आहोत. त्याचा फायदा तर घेणारच. तो फायदा आम्ही घेतला. पण हे जे काही घडलं ते एका दिवसात नाही घडलं. बऱ्याच कालावधीत हे सगळं घडलं. त्यांच्यासोबत अन्याय झाला. तो अन्याय झाल्यानंतर सर्व आमदार आमच्यासोबत आले", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

First published: