मुंबई, 16 ऑक्टोबर : अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली होती. या विनंतीची दखल घेत निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाला आणि शिंदे गटाला पोटनिवडणुकीसाठी वेगवेगळी नावं आणि चिन्हांना मान्यता दिली. पण त्यानंतर शिंदे गटाने पोटनिवडणुकीसाठी उमेदवारच उभा केला नाही. याउलट भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांना पाठिंबा दिला. या मुद्द्यावरुन शिंदे गटावर टीका केली जात आहे. पण शिंदे गटाने पोटनिवडणुकीसाठी उमेदवार का उभा केला नाही याबाबत मंत्री उदय सामंत यांनी भूमिका मांडली आहे.
"विरोधकांकडून आमच्याकडून अंधेरी पोटनिवडणुकीत टारगेट करण्याचा प्रयत्न होतो असा आरोप केला जात आहे. निवडणूक आयोगाने पक्ष, नाव, चिन्ह हे दिलं मग उमेदवार का दिला नाही? असे विचारले जात आहे. धनुष्यबाण चिन्ह न मिळाल्याने आम्ही अंधेरी निवडणुकीत उमेदवार न देता भाजपच्या उमेदवाराला पाठींबा दिला आहे" असं उदय सामंत म्हणाले.
"ठाकरे गटाला मशाल ही निशाणी मिळाली. पण त्यांनीच धनुष्यबाण गोठविण्याचा प्रयत्न केला. आम्हाला धनुष्यबाण चिन्ह मिळावे यासाठी लढाई सुरु राहील. चिन्ह न मिळाल्याने आम्ही ही नाराज आहोत", अशी भूमिका सामंत यांनी मांडली.
(ठाकरेंनंतर शिंदेंचं पुढचं टार्गेट पवार, 'राष्ट्रवादी'चा पेपर आधीच फोडला!)
दरम्यान, अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध निवडून द्यावी, असं विनंती करणारं पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं आहे. या पत्रावरदेखील सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. "मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या पत्रावर देवेंद्र फडणवीस यांनी अपली भूमिका मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडलेली भूमिका ही राज ठाकरे यांच्या प्रामाणेच आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत पक्षाची भूमिका मांडली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याआधी भूमिका मांडणे बरोबर नाही. आधीच ही निवणूक बिनविरोध करण्याची भूमिका मांडायला हवी होती. पण हिंमत असेल तर बिनविरोध ही निवडणूक करा, अशी भाषा वापरणे चुकीचं आहे", असं सामंत म्हणाले.
"शरद पवार, राज ठाकरे यांनी संयमाने भूमिका मांडली. काही लोक हिंमतीची भूमिका मांडत आहेत. एकनाथ शिंदे काम करत आहेत. त्यावर कोणी बोलत नाही. त्यांनी किती बंगले ठेवले आहेत? यावर बोलले जात आहे. हे चुकीचे आहे", असं देखील उदय सामंत म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Andheri East Bypoll, Eknath Shinde, Shiv sena, Uddhav tahckeray