जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / MCA Election : 'एमसीए'च्या सामन्यात तीनही ठाकरे 'खेळाडू', पण मैदानातच उतरले नाहीत!

MCA Election : 'एमसीए'च्या सामन्यात तीनही ठाकरे 'खेळाडू', पण मैदानातच उतरले नाहीत!

MCA Election : 'एमसीए'च्या सामन्यात तीनही ठाकरे 'खेळाडू', पण मैदानातच उतरले नाहीत!

मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएच्या निवडणुकीसाठीचं मतदान पार पडलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 20 ऑक्टोबर : मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएच्या निवडणुकीसाठीचं मतदान पार पडलं आहे, पण या निवडणुकीत उद्धव ठाकरे , आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी मतदान केलं नाही. तीनही ठाकरे हे एमसीएचे सदस्य आहेत, पण ते मतदानाला का आले नाहीत, याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. एमसीए निवडणुकीमध्ये पवार-शेलार पॅनल रिंगणात उतरलं आहे. या पॅनलमध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी आहेत. शरद पवार आशिष शेलार यांच्या या पॅनलमध्ये जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर यांचाही समावेश आहे. एमसीए निवडणुकीच्या आदल्या दिवशी पवार-शेलार पॅनलचे सगळे नेते एकत्र आले होते. शरद पवारांनी या पॅनलसाठी डिनर डिप्लोमसीचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला शरद पवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , आशिष शेलार, मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक सहभागी झाले होते. या नेत्यांनी पवार-शेलार पॅनलला विजयी करण्याचं आवाहन केलं होतं. ‘तीन महिन्यांपूर्वी आम्हीही बॅटिंग केली, काहींचा अप्रत्यक्ष आशिर्वाद,’ पवारांसमोर काय बोलले एकनाथ शिंदे? महाराष्ट्रात घडलेल्या सत्ता संघर्षानंतर सर्वपक्षीय नेते एकत्र आले, त्यामुळे ठाकरे कुटुंबाने एमसीए निवडणुकीत मतदान केलं नाही का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. अमोल काळे-संदीप पाटील लढत दरम्यान एमसीएच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही माजी क्रिकेटर संदीप पाटील आणि पवार-शेलार गटाचे उमेदवार अमोल काळे यांच्यात रंगणार आहे. आशिष शेलार बीसीसीआय निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यानं पवार-शेलारांच्या गटानं अमोल काळेंच्या नावाची अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून घोषणा केली. त्याआधी संदीप पाटील यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावेळीही मोठा ड्रामा रंगला होता. संदीप पाटलांनी अर्ज दाखल करताना आपण पवार गटाकडून अर्ज दाखल करत असल्याचं म्हटलं होतं. पण त्यानंतर पवार आणि शेलारांची युती झाली. त्यावेळी शेलारांनी अध्यक्षपदासाठी अर्ज केला. त्यानंतर संदीप पाटलांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे आता अध्यक्षपदी पाटलांची वर्णी लागणार की पवार-शेलार गटाचा उमेदवार सिक्सर मारणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात