अजित पवार यांच्या बारामतीतील निवासस्थानासमोर मराठ्यांनी वाजवला ढोल

अजित पवार यांच्या बारामतीतील निवासस्थानासमोर मराठ्यांनी वाजवला ढोल

मराठा आरक्षण तत्काळ लागू करा, अन्यथा खुर्च्या सोडा...

  • Share this:

बारामती, 26 सप्टेंबर: सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी सरकारविरोधात एल्गार पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षण तत्काळ लागू करा, अन्यथा खुर्च्या सोडा, अशी मागणी करत शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील निवासस्थानासमोर सकल मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी 'ढोल बजाव' आंदोलन केलं. पोलिसांनी मराठा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

हेही वाचा..ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय, सुटी सिगारेट व बिडी विक्रीला राज्यात बंदी!

भिगवण मार्गावरील पीएनजी चौकातून सकल मराठा मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चात मराठा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या वेळी मराठा कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टसिंग, मास्कचा वापर केला.

हातात भगवा झेंडा घेऊन 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा देत मराठा आंदोलक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर एकत्र आले. मराठा आरक्षण टिकवा, नाही तर मराठा समाजाचे खासदार, आमदार आणि मंत्र्यांनी राजीनामा द्या. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. मराठा आंदोलकांनी जवळपास एक तास अजित पवार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केलं. मात्र. त्यानंतर पोलिसांनी मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थित बैठक

दुसरीकडे, मराठा आरक्षण आंदोलनाचं नाशकात बिगुल वाजलं आहे. सर्व मराठा संघटना नाशकात एकाच छताखाली एकत्र आल्या आहेत. मराठा संघटनांच्या राज्यस्तरीय बैठकीला सुरुवात झाली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित आहेत. तर खासदार उदयनराजे भोसले यांचे प्रतिनिधी म्हणून यशराजे पाटील या बैठकीत सहभागी झाले आहेत. त्याबरोबर राज्यातील 22 जिल्ह्यांचे समन्वयक सहभागी झाले आहेत.  मराठा  आंदोलनाची रणनीती आखण्यासाठी ही महत्त्वाची बैठक असल्याचं बोललं जात आहे.

शरद पवार यांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केलं असतं तर...

दरम्यान,राज्यसभेत कृषीविधेयक मंजूर झाल्यानंतर अन्नत्याग आंदोलन करणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजप नेते आणि माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सडकून टीका केली आहे. शरद पवार राज्यातील मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग आंदोलन केले असते तर अधिक बरं वाटलं असतं, असा टोलाही विनोद तावडेंनी लगावला. कृषीविषयक विधेयक नीट पाहिले तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची योजना केंद्र सरकारनं आणली आहे, अशा शब्दात विनोद तावडेंनी केंद्र सरकारवर स्तुतिसुमनेही उधळली.

राज्यसभेत कृषीविधेयक मंजूर करताना राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह यांनी केलेल्या वर्तनावर शरद पवारांनी संताप व्यक्त केला होता. राज्यसभेच्या उपाध्यक्षांचं वर्तन चुकीचे असल्याचे सांगत शरद पवार यांनी 22 सप्टेंबरला एक दिवसासाठी अन्नत्याग आंदोलन केलं होतं. यावरून भाजप नेते विनोद तावडे यांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

हेही वाचा... मुंबईकरांसाठी मोठी बातमी, 'या' महिन्यात मुंबई होऊ शकते अनलॉक'

विनोद तावडे म्हणाले, कृषी विधेयकावरुन अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या शरद पवार मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग आंदोलन केले असते, तर अधिक बरं वाटलं असतं. शरद पवार हे स्वतः देशाचे कृषीमंत्री होते. त्यांना कृषी विधेयकामध्ये काही दुरुस्त्या सुचवायच्या असत्या, तर त्यांनी राज्यसभेत बोलणं गरजेचं होतं. शेतकरी हिताच्या दुरुस्त्या नक्कीच सरकारनं स्वीकारल्या असत्या. पण शरद पवार यांच्यासारख्या माजी कृषीमंत्री आणि ज्येष्ठ नेत्यानं केवळ विरोधासाठी विरोध करणे सामान्य शेतकऱ्याला पटलेले नाही, असा घणाघात विनोद तावडेंनी यावेळी केली.

Published by: Sandip Parolekar
First published: September 26, 2020, 12:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading