मुंबई, 16 जानेवारी : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांवरून महाविकासआघाडीमध्ये खडाखडी झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी झालेल्या गोंधळावरून आणि शिवसेनेला एकही जागा न मिळाल्याबद्दल थेट नाराजी व्यक्त केली आहे. तसंच यापुढे असं होणार नाही, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे. या निवडणुकांसाठी अमरावती आणि नाशिकमध्ये काँग्रेसचा उमेदवार, कोकणात शेतकरी कामगार पक्ष, नागपुरात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मराठवाड्यात राष्ट्रवादीला तिकीट देण्याचं महाविकासआघाडीचं ठरलं. यातल्या नागपूरच्या जागेसाठी काँग्रेस आधीपासूनच आग्रही होती, पण चर्चेनंतर ही जागा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पाचही जागांपैकी एकाही जागेवर शिवसेनेला उमेदवारी मिळाली नाही. संजय राऊतांनी सुनावलं ‘एकत्र बसून सुरूवातीला चर्चा झाली त्यानुसार नागपूर शिवसेनेसाठी सोडलं होतं, पण प्रत्येक वेळी त्याग करण्याची जबाबदारी शिवसेनेवरच असते. विरोधकांचं ऐक्य वगैरे या महान शब्दांना महत्त्व देऊन आम्ही त्याग करत आलो, पण यापुढे असं होणार नाही. यापुढे आम्ही आमच्या भूमिका ठरवू,’ असा इशारा संजय राऊत यांनी महाविकासआघाडीला दिला आहे. ‘गंगाधर नाकाडे हे आमचे नागपूरमधून उमेदवार होते, त्यांची उमेदवारी आम्ही मागे घ्यायला सांगितली. महाविकासआघाडी म्हणून एकत्र लढलं पाहिजे म्हणून आम्ही ती उमेदवारी मागे घेतली. सुधाकर आडबाले यांच्या मागे उभं राहण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे-नाना पटोले आणि उद्धव ठाकरे-शरद पवार यांच्यात चर्चा झाली, त्यानंतर हा निर्णय घेतला,’ असं संजय राऊत यांनी सांगितलं. ‘या निवडणुकीत महाविकासआघाडीच्या उमेदवाराबाबत आणि काही निर्णयांबाबत विस्कळीतपणा दिसला. यापुढच्या निवडणुकींमध्ये आपण अधिक काळजीपूर्वक पावलं टाकली पाहिजेत. अशाप्रकारचे घोळ आणि गोंधळ होता कामा नये, हा धडा महाविकासआघाडीतल्या प्रत्येक घटकपक्षाने घेतला पाहिजे,’ असं परखड मत संजय राऊत यांनी मांडलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.