जितेंद्र जाधव (प्रतिनिधी) बारामती, 28 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर आणि दिवाळीनिमित्त बारामतीमध्ये गोविंद बागेत पवार कुटुंबीयांना भेटण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी गोविंद बागेत शरद पवार, अजित पवार ,सुप्रिया सुळे, रोहित पवार ,जय पवार ,पार्थ पवार उपस्थित होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे-पाटील यांच्यासह अनेक राजकीय नेते बारामतीत दाखल झाले आहेत . निवडणुकीमध्ये विक्रमी मतदान मिळाल्यानंतर अजित पवार बारामतीत आले आहेत. यंदाची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक या दोनच नेत्यांच्या खणाखणीनं गाजली. तसं पाहिलं तर एका नेत्याचा सांसदिय कारकिर्दीचा अनुभव तब्बल 52 वर्षांचा. तर दुसऱ्या नेत्याचं वयही तितकं नाही. शरद पवारांमुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला संजीवनी मिळाली. मात्र ‘मी पुन्हा येईन’ असं आत्मविश्वासानं सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी काही जागा कमी झाल्या तरी स्पष्ट बहुमत मिळवून पवारांवर मात केली. शरद पवारांच्या पावसातल्या झंझावाती सभेनं निवडणुकीचं चित्रच पालटलं. पाऊस आणि पवारांनी सत्ताधाऱ्यांचा उधळलेला वारू अडवला. मात्र, पवार मुख्यमंत्र्यांना सत्तेपासून रोखण्यात अपयशी ठरले. फडणवीस आणि पवार या लढतीत मुख्यमंत्र्यांची सरशी झाली हे वास्तव आहे. मात्र गळतीचं ग्रहण लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा नवसंजीवनी निवडणुकीच्या निकालानंतर मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. पवार कुटुंबाला भेटण्यासाठी खास बारामतीसह राज्यभरातून हजारोंच्या संख्येनं कार्यकर्त्ये आल्याचं पाहायला मिळालं. तर ‘बारामतीकरांनी मला मोठ्या मतदाधिक्यानं निवडणून दिल्याबद्दल त्यांचे आभार’, अशी प्रतिक्रियाही यावेळी अजित पवारांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







