विनोद राठोड, प्रतिनिधी मुंबई, 21 जून : गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बरीच उलथापालथ पाहायला मिळाली. पवारांचा राजीनामा ते पक्षाला दोन नवीन कार्याध्यक्ष. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24वा वर्धापन दिन मुंबईत पार पडत आहे. विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी अजित पवार यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पदात रस नाही. मला या जबाबदारीतून मुक्त करा, अशी जाहीर मागणीच पक्षाच्या वर्धापनाच्या कार्यक्रमात केली आहे. यावर आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे पाहावे लागणार आहे. काय म्हणाले अजित पवार? 25 वर्षांच्या जडणघडणीमध्ये नवीन पिढी पुढे येत आहे. शरद पवार यांनी भाकरी फिरवली पाहिजे. राष्ट्रीय मान्यता गेली आहे. बरेच जण मंत्री होतात पण स्वतः शिवाय दुसऱ्या कोणालाही निवडून आणू शकत नाही. ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल आणू शकतात, केजरीवाल दोन राज्य आणू शकतात तर शरद पवार सर्वांत उजवे आहेत की नाही? मग आपण स्वतःच्या ताकदीने राज्यात सरकार का आणू शकलो नाही. मुंबई आणि विदर्भात कमजोर पडलो आहे. मुंबईत अध्यक्ष निवडता आला नाही. सेलमध्ये बदल करायचे की नाही? भाषण देऊन पहिला नंबर येणार नाही, अशी स्पष्टी भूमिका यावेळी अजित पवार यांनी घेतली. वाचा - ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत मोठी कपात; एस्कॉर्ट व्हॅनसह ‘मातोश्री’वरील सुरक्षाही कमी विरोधी पक्षनेतेपदात रस नाही : अजित पवार नव्या चेहराला विधानसभा, लोकसभा निवडणुकीत संधी द्यायची आहे. विरोधी पक्षनेते पदात इंटरेस्ट नाही. मला विरोधी पक्ष नेत्याच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि संघटनांची जबाबदारी द्या, अशी जाहीर मागणीच अजित पवार यांनी केली आहे. अजित पवार यांची प्रदेश अध्यक्ष होण्याची इच्छा असून विरोधी पक्षनेते पद सोडण्याच्या तयारीत दिसले. संघटनामध्ये मोठी जबाबदारी देण्याची मागणी केली आहे. शरद पवारांनी भाकरी फिरवली गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवण्याबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी केलेले विधान चर्चेत आहे. त्यात शरद पवारांनी 10 जूनच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांची नियुक्ती केली. त्यासोबतच जितेंद्र आव्हाडांनाही राष्ट्रीय पातळीवर विविध राज्यांचे प्रभारीपद सोपवले. आता खासदार सुनील तटकरे यांनाही पवारांनी मोठी जबाबदारी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.