राधाकृष्ण विखेंच्या गडाला सुरूंग लावण्यासाठी 'टीम ठाकरे'ची खेळी?

राधाकृष्ण विखेंच्या गडाला सुरूंग लावण्यासाठी 'टीम ठाकरे'ची खेळी?

स्वपक्षात असतानाही एकमेकांचे राजकीय विरोधक असलेल्या थोरात आणि विखे यांच्यात आता तर लढाई तीव्र झाली आहे.

  • Share this:

हरीष दिमोटे, प्रतिनिधी

अहमदनगर, 31 डिसेंबर : अहमदनगर जिल्ह्यात विखे पाटलांची राजकीय ताकद कमी करण्याची खेळी रचण्यात आली आहे. विखे पाटलांचे पारंपारिक विरोधक असलेल्या गडाख, तनपुरे आणि थोरात कुटुंबात मंत्रिपदं देवून विखेंना शह देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

स्वपक्षात असतानाही एकमेकांचे राजकीय विरोधक असलेल्या थोरात आणि विखे यांच्यात आता तर लढाई तीव्र झाली आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद सोडून भाजपात दाखल झालेल्या राधाकृष्ण विखे पाटलांना शह देण्यासाठी त्यांच्या विरोधकांना ताकद दिली जात आहे.  मंत्रिमंडळ विस्तारात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांना राज्यमंत्री करण्यात आलं आहे.

राहुरी मतदारसंघातील तनपुरे साखर कारखान्यावर विखेंनी सत्ता मिळवली आहे. त्याबरोबरच मतदारसंघातील अनेक गावात विखे विरूद्ध तनपुरे असा कायमच संघर्ष बघायला मिळत आहे. राहुरीचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांना पराभूत करत प्राजक्त तनपुरे आमदार झाले आहेत. कर्डीले यांना पराभूत करण्यासाठी विखेंनी तनपूरेंना मदत केल्याची चर्चा आहे तर कर्डीले यांनी तर थेट पक्षाकडेच विखेंविरोधात तक्रार केली आहे. तनपुरे आणि विखे यांच्यात खरं तर पारंपारिक राजकीय वैमनस्य आहे. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांना मिळालेलं मंत्रिपद विखेंना राहुरी विधानसभा मतदारसंघात शह देण्यासाठी आहे का? असाही प्रश्न उपस्थित होतोय.

यशवंतराव गडाख आणि बाळासाहेब विखे पाटील यांची 1991 साली झालेली खासदारकीची निवडणूक सर्वश्रुत आहे. त्यांच्या झालेल्या या निवडणुकीने विखे गडाख कुटुंबात वितुष्ठ निर्माण झाले होते. आजही अनेकदा विखे गडाख लढाईचा संदर्भ दिला जातो. गेल्यावेळी विखे समर्थक असलेल्या तत्कालीन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे यांना भाजपाची उमेदवारी मिळाली. आणि त्यांनी शंकरराव गडाख यांचा पराभव केला होता. मात्र, यावेळी शंकरराव गडाख यांनी कोणत्याही पक्षाचं तिकट न घेता स्वतःच्या क्रांतीकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून अपक्ष निवडणूक लढवली आणि भाजपाचे बाळासाहेब मुरकुटे यांचा मोठा मताधिक्याने पराभव केला.

स्थानिक स्वराज्य संस्थेतही गडाखांची मोठी ताकद आहे. आज अहमदनगर जिल्हा परिषदेत विखे पाटलांच्या पत्नी शालिनीताई विखे अध्यक्ष आहेत. मात्र, विखेंच्या भाजप प्रवेशानंतर आता सर्व गणितं बदलणार आहेत किंवा ती बदलावी आणि विखेंना जिल्हा परिषदेपासूनही बाहेर ठेवावं यासाठीच गडांखांसह तनपूरेंना मंत्रिपदी बसवलं गेलंय.

विखेंचे राजकीय विरोधक असलेल्या बाळासाहेब थोरातांना अगोदरच मंत्री करण्यात आलं आहे. आता तनपुरे आणी गडाख यांना मंत्रिपदं दिल्याने अहमदनगर जिल्ह्यातील विखेंच्या सत्तेला सुरूंग लागणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल.

First published: December 31, 2019, 8:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading