मुंबई, 12 नोव्हेंबर: एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे. भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपये देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. विदेश म्हणजे दिवाळी पूर्वीच भाऊबीजेची भेट देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
कोरोना काळात लाखो बालके, स्तनदा मातांना घरपोच आहार पोहचवणे तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे; त्यामुळे दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट देण्यात येणार असल्याचं यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
हेही वाचा..सावधान! कोरोनाची दुसरी लाट येणार, औषध प्रशासन मंत्र्यांनी दिले संकेत
राज्यात 93 हजार 348 अंगणवाडी सेविका, 88 हजार 353 अंगणवाडी मदतनीस व 11 हजार 341 मिनी अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी 2 हजार रुपये भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. यासाठी 38 कोटी 61 लाख रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे.
यशोमती ठाकूर म्हणाल्या, कोरोनाच्या लॉकडाऊन काळात अभूतपुर्व परिस्थिती निर्माण झाली असताना बालकांच्या, मातांच्या पोषण आहाराचा, कुपोषणाचा प्रश्न गंभीर होता. यावेळी दुर्गम भागात चालत जाऊन, नावेने नदी पार करत अशा विविध अडचणींवर मात करत अंगणवाडी सेविकांनी घरोघरी पोषण आहार पोहोचवला. स्थलांतरित मजूरांच्या अपत्यांचीही काळजी घेतली. या सगळ्यामुळेच पोषण माह कार्यक्रमात महाराष्ट्राने देशात अव्वल क्रमांक पटकावला.
कोविडमुक्त महाराष्ट्रासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानातही घरोघरी जात महत्वाची जबाबदारी महिलांनी बजावली आहे. त्यांच्या कामाचा अभिमान शासनाला आहे. त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट देण्यात येत आहे, असेही यशोमती ठाकूर यांनी सांगितलं.
आशा स्वयंसेविकांनाही गोड बातमी
राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जुलै ते ऑक्टोबर 2020 या कालावधीतील वाढीव मोबदला देण्यासाठी 57.56 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. ही माहिती माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. दिवाळी सणापूर्वी राज्यातील सुमारे 70 हजार आशा भगिनींना वाढीव मोबदल्याचा लाभ मिळणार असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
हेही वाचा..‘दिवाळीनंतर ठाकरे सरकारचे फटाके वाजणार’ नारायण राणे यांनी दिला इशारा
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक ह्या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत. ग्रामीण आरोग्याच्या ते कणा आहेत. त्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णय दिनांक 25 जून 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना 1 जुलै 2020 पासून प्रत्येकी 2000 व 3000 रुपये इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला.