ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी
कोल्हापूर, 16 जुलै : कोल्हापुरातल्या कुस्तीच्या आखाड्याची नेहमी चर्चा असते. पण आता कोल्हापुरात राजकीय आखाडा चांगलाच रंगताना दिसतोय. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा कोल्हापूर दौरा हा शिवसेनेत वादळ घेवून येणारा ठरताना दिसतोय. कारण विनायक राऊत यांनी शुक्रवारी कोल्हापुरातल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात जी फटकेबाजी केली होती त्या फटकेबाजीचा शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे. कारण त्या फटकेबाजीतून त्यांनी कोल्हापुरातील इतर नेत्यांवर केलेली टीका ही शिवसेनेसाठी घातक ठरण्याची शक्यता आहे. त्यांच्या टीकेनंतर आता कोल्हापुरातील शिवसेनेचे दोन्ही खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
विनायक राऊतांनी शिवसेनेचे माजी आमदार आणि राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर सडकून टीका केली होती. क्षीरसागर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रेमाने जेवायला बोलावले आणि त्याचे पैसे काँग्रेसच्या सतेज पाटील यांच्याकडून घेतले, असा दावा केला होता. विनायक राऊतांची ही टीका क्षीरसागर यांच्या प्रचंड जिव्हारी लागली आणि त्यांनी राऊतांना थेट आव्हानच दिले. कोल्हापुरातील शिवसेनेचे दोन्ही खासदार शिंदे गटात येतील, असा इशारा राऊतांना दिला. विशेष म्हणजे क्षीरसागर यांच्या आव्हानानंतर काही तासांनी आता खरंच दोन्ही खासदार हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
(संजय राऊतांचा संविधानाचा दाखला देत राज्यपालांना सवाल, भाजपच्या अॅडव्होकेट आमदाराकडून सडेतोड उत्तर)
विशेष म्हणजे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने या दोघांनी विनायक राऊतांच्या कार्यक्रमात काल गैरहजेरी लावली होती. संजय मंडलिक हे दिल्लीला असल्याची माहिती समोर आली होती. तर धैर्यशील माने हे आजारी असल्याचं कारण समोर आलं होतं. पण विनायक राऊत यांनी राजेश क्षीरसागर यांच्यावर टीका केल्यानंतर क्षीरसागर यांनी दोन्ही खासदार हे शिंदे गटात सामील होतील, असा दावा केला होता. या दोन्ही आमदारांनी अद्याप आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते शिंदे गटाच्या वाटेवर आहेत.
शिंदे गटाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. राज्यभरातील शेकडो शिवसैनिक हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. ठाणे, पालघर, नवी मुंबईमधील अनेक महापालिकांच्या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला आहे. तसेच 40 पेक्षा जास्त शिवसेनेचे आमदार शिंदे गटासोबत आहेत. शिंदे गटावर टीका करणारे आमदार त्यांच्या गटात सहभागी होत आहेत, हे त्यांच्या गटाला मिळालेलं यश मानलं जात आहे. दुसरीकडे शिवसेनेतून सुरु असलेली एवढी मोठी गळती पाहून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात फिरुन कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Kolhapur, Shiv sena, Shiv Sena (Political Party), Shivsena