साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर, 25 मार्च : एखादी भरमसाठ फी घेणारी शाळा ही उत्तम आहे, असा अनेकांचा समज असतो. महानगरांमध्ये खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी मोठी गर्दी होती. एखाद्या महानरपालिकेच्या शाळेत आपल्या पाल्याला ॲडमिशन मिळालेच पाहिजे यासाठी पालकांनी केलेली धडपड आजकाल कुठे बघायला मिळत नाही. मात्र जगात भारी कोल्हापुरात हे घडलं आहे. फक्त याच वर्षी नाही, तर गेल्या काही वर्षात दरवर्षी या शाळेत ॲडमिशन मिळवण्यासाठी चक्क पालकांच्या रांगा लागलेल्या असतात.
कोल्हापुरातील जरगनगर परिसरातील महागरपालिकेची श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर शाळेत दरवर्षी प्रवेशासाठी रांगा लागतात. गुढी पाडव्याच्या पहिल्याच दिवशी काही तासांमध्येच येथील ॲडमिशन फुल होतात. यावर्षी इथं ॲडमिशन मिळवण्यासाठी पालक शाळेच्या आवारात रांगा लावून उभे होते.
आदल्या दिवसापासून गर्दी
दरवर्षी शाळेत ॲडमिशन गुढीपाडव्याला दिले जाते. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येते. त्यामुळे आदल्या रात्रीच 9 नंतर पालकांनी शाळेच्या आवारात यायला सुरुवात केली होती. ही गर्दी वाढतच चालली होती. काही पालक तर तिथेच झोपायच्या तयारीने आले होते. अखेर शाळा प्रशासनाकडून रात्री 1.30 वाजता आलेल्या पालकांना टोकन वाटप करून घरी जाण्याचे आवाहन करण्यात आलं. त्यानंतर गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी 8 ते 10 या वेळेत ॲडमिशन प्रक्रिया पार पाडण्यात आली.
आरोग्य सेवकाचा मुलगा बनला उपजिल्हाधिकारी! पाहा काय आहे यशाचा मंत्र, Video
काय आहे यशाचं रहस्य?
महापालिकेच्या शाळेच्या या प्रगतीचे खरे शिल्पकार येथील शिक्षक आहेत. हे शिक्षक मुलांच्या अभ्यासात कोणतीही टाळाटाळ करत नाहीत. या शाळेत शिक्षक पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षांची विशेष तयारी करून घेतात. त्याचबरोबर इयत्ता पहिली ते चौथी टॅलेंट सर्च, जवाहर नवोदय विद्यालय, सातारा सैनिक स्कुल, NMMS, गणित प्रज्ञाशोध अशा अनेक परीक्षांची तयारी देखील विशेष लक्ष देऊन शाळेच्या अतिरिक्त वेळेत करण्यात येते.
' शिक्षकांची शिक्षणाविषयी आणि विद्यार्थ्यांबद्दल असलेली तळमळ, पहिलीपासून स्पर्धा परीक्षेची तयारी, अध्यायानात नवीन तंत्रज्ञानाचा वापर त्याचबरोबर इथं राबवण्यात येणारे नवीन उपक्रम यामुळे आमच्याशाळेकडं विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. ही आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांसाठी अभिमानाची बाब आहे' असं शाळेच्या केंद्र मुख्याध्यापिका नीता ठोंबरे यांनी सांगितलं.
मराठवाड्यातील छोट्या खगोलशास्त्रज्ञानाला मिळणार मोठी संधी, पाहा Video
'मी रात्री 3 वाजता शाळेत गेलो होतो. त्यावेळी मला प्रवेशासाठी 249 नंबरचा टोकन नंबर मिळाला. मुलाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ही शाळा खूप छान आहे. त्यामुळे मला इथंच प्रवेश हवा होता', असं मत या शाळेतील विद्यार्थ्याचे पालक डॉ. राहुल पाटील यांनी व्यक्त केलं.
'या ठिकाणी रचण्यात आलेल्या आमच्या शैक्षणिक पायाचा मला माझ्या आयुष्यात फायदा झाला. इथल्या अभ्यासाच्या पॅटर्नमुळेच मी यशस्वी होऊ शकलो, अशी भावना येथील माजी विद्यार्थी आणि सध्या सीए असलेले प्रतीक दिवटे यांनी व्यक्त केली.
खाजगी किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळा एकीकडे भरमसाठ फी घेऊन शिक्षण घेत असताना महानगरपालिकेच्या एका शाळेत उत्तम दर्जाचे मिळणारे शिक्षण हे एक आदर्श उदाहरण आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.