रोहित देशपांडे, प्रतिनिधी
बीड, 22 मार्च: 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात' अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. तसाच काहीसा प्रत्यय बीड जिल्ह्यातील इयत्ता सहावीत शिकणाऱ्या मुलाबद्दल येतोय. इयत्ता दुसरीपासूनच खगोलशास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अभिनव विटेकर याची राज्यस्तरीय खगोल संमेलनासाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे या संमेलनात हजेरी लावण्याची संधी मिळालेला अभिनव हा मराठवाड्यातील एकमेव विद्यार्थी आहे.
रत्नागिरीत राज्यस्तरीय खगोल संमेलन
महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे 15 ते 17 एप्रिल दरम्यान 12 व्या राज्यस्तरीय खगोल संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाड्यामधून अभिनव विटेकर या विद्यार्थ्याला आमंत्रित करण्यात आले आहे. या संमेलनाला जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात अभिनवला खगोलशास्त्रा विषयी अधिक माहिती मिळणार आहे.
अभिनवल कशी मिळाली संधी?
छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांच्याशी एका कार्यक्रमादरम्यान अभिनवची भेट झाली. तेव्हा अभिनवला खगोलशास्त्रात रूची असल्याचे लक्षात आले. या विषयातील त्याची आवड पाहाता औंधकर यांनी त्याला एका संकेतस्थळावर अर्ज करण्यास सांगितले. त्यानंतर तो या संमेलनासाठी पात्र ठरला. या संमेलनात जगभरातील खगोलशास्त्रज्ञ येत असतात. या ठिकाणी खगोलशास्त्रातील संशोधन, नव्या घडामोडी याबद्दल चर्चा होते. हे संमेलन भविष्यातील शास्त्रज्ञ घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
सहावीतील शास्त्रज्ञ! मियावाकी पद्धतीनं करतोय झाडं लावण्यावर संशोधन, पाहा Video
अभिनवला व्हायचंय खगोलशास्त्रज्ञ
माजलगाव तालुक्यातील नाकलगाव या गावातील अभिनव विटेकर हा सिंदफणा पब्लिक स्कूलमध्ये सहावीच्या वर्गात शिक्षण घेतो. इयत्ता दुसरी पासूनच त्याला खगोलशास्त्राच्या अभ्यासाची आवड निर्माण झाली. त्याने खगोलशास्त्राची विविध पुस्तके वाचली. तसेच अंतराळातील अनेक घटना, खगोलीय घडामोडी याचा तो अभ्यास करत आहे. त्याला भविष्यात मोठा खगोलशास्त्रज्ञ व्हायचं आहे.
अंतराळ अभ्यासासाठी दूर्बिनचा वापर
अभिनव हा अंतराळाचा अभ्यास करण्यासाठी दुर्बिनचा उपयोग करतो. अंतराळातील ग्रह, तारे यांच्याबद्दल तो वेगवेगळी माहिती संकलित करतो. त्यासह जागतिक पातळीवर नावाजलेल्या वैज्ञानिकांची पुस्तके देखील तो वाचतो. याच बळावर तो आता राज्यस्तरीय खगोल संमेलनात खगोल विषयातील ज्ञान आत्मसात करण्यासाठी जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Beed news, Education, Local18, School student