कोल्हापूर, 03 डिसेंबर : कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यासह सोलापूर अक्कलकोट आमचा भाग असल्याचे सांगत नवा वाद पेटवला होता. दरम्यान यावर पडदा पडत असताना. पुन्हा एकदा नवा वाद समोर आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील नेत्यांच्या बेळगाव दौऱ्याला विरोध केला आहे.
कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, असा संदेश कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पाठवला असल्याचे बोम्मई यांनी सांगितले. दरम्यान, छुप्या मार्गाने महाराष्ट्रातील कोणताही नेता बेळगावमध्ये येऊ नये, म्हणून सीमाभागात नाके तयार करत दोन हजार कर्नाटक पोलिसांचा खडा पहारा ठेवण्यात आला आहे.
हे ही वाचा : …तर संजय राऊतांवर होऊ शकतो हल्ला? भुजबळांनी व्यक्त केली भीती, सांगितला बेळगाव लढ्याचा इतिहास
दरम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई हे दोन मंत्री आज शनिवार बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. परंतु त्याचा दौरा लांबणीवर पडला असून सहा डिसेंबरला ते बेळगावला जाणार असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्राचा एकही नेता बेळगावमध्ये जाऊ नये, म्हणून कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सीमाभागातील 21नाक्यांवर दोन हजारो पोलिस तळ ठोकून आहेत. सहा डिसेंबरपर्यंत हा बंदोबस्त कायम राहणार आहे. राज्य राखीव दलाच्या तुकड्या येथे तैनात करण्यात आल्या आहेत. अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी येथे आले आहेत.
हे ही वाचा : महाराष्ट्र आणि कर्नाटकवादात कळीचा मुद्दा कोणता? कोणत्या भागावरुन सुरूय वाद?
महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांत सध्या भाजपचे सरकार आहे. तरीही सीमानाक्यावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने सीमाभागातील मराठी बांधवातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या भागात प्रचंड तणावाचे वातावरण आहे, अशी माहिती सीमाभागातील नागरिकांनी दिली.