साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर, 6 फेब्रुवारी : चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कोल्हापूरला एक विशेष स्थान आहे. भारतीय चित्रपसृष्टीतील बऱ्याच गोष्टी सर्वात आधी कोल्हापुरात घडल्या आहेत. पृथ्वीराज कपूर भालजी पेंढारकरांकडे काम करायचे. अभिनेते राज कपूर यांनी तर कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओमध्येच पहिल्यांदा मेकअप केला होता. मराठी चित्रपटसृष्टीचं माहेरघर अशी कोल्हापूरची ओळख आहे. ही ओळख निर्माण होण्यात ऐतिहासिक जयप्रभा स्टुडीओचा मोठा वाटा आहे.
कोल्हापूरचा हाच जयप्रभा स्टुडिओ अनेकदा वादात सापडला. गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्याशी हा वाद जोडण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार आणि लता मंगेशकर यांचा जवळून सहवास लाभलेल्या उदय कुलकर्णी यांनी जयप्रभा स्टुडिओ आणि लतादीदींबाबतच्या आठवणी सांगितल्या आहेत.
जयप्रभा स्टुडिओचा इतिहास
प्रभात फिल्म कंपनी पुण्याला स्थलांतरीत झाल्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी 1 ऑक्टोबर 1933 रोजी कोल्हापूर सिनेटोनची स्थापना केली होती. तर आक्कासाहेब महाराजांनी शालिनी सिनेटोन सुरू केला होता. त्यांनी पुढं 13 वर्ष हा स्टुडिओ चालवला. तर दादासाहेबांनी या स्टुडिओच्या देखभालीची जबाबदारी चित्रपट तपस्वी भालजी पेंढारकर यांच्याकडे दिली. तब्बल तेरा एकर जागेवर हा स्टुडिओ उभा होता. लजींनी राजा शिवछत्रपती, मोहित्यांची मंजुळा, जगतजननी महालक्ष्मी अशा अनेक चित्रपटांची निर्मिती आणि चित्रीकरण याच स्टुडिओत केल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली.
भालजी पेंढारकर यांनी 1946 साली 2 लाख 10 हजार रुपयांना संस्थानिकाकडून कोल्हापूर सिनेटोन विकत घेतला. त्यानंतर या स्टुडिओला जयप्रभा स्टुडिओ ही ओळख मिळाली. चित्रीकरणासाठी उपयुक्त ठिकाण असल्यामुळे मराठी, हिंदी आणि प्रादेशिक चित्रपट निर्माते स्टुडिओमध्ये चित्रीकरणासाठी येत असत. त्यावेळी मद्रासहून दिग्दर्शक खास जयप्रभामध्ये चित्रीकरणासाठी आवर्जून यायचे. दादा कोंडके यांच्याही अनेक चित्रपटांचे चित्रीकरण याच स्टुडिओत झाले आहे, असे देखील उदय कुलकर्णी यांनी सांगितले.
लता मंगेशकर आणि जयप्रभा स्टुडिओ
'महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर 1948 साली पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. त्यावेळी हा स्टुडिओ देखील पेटवून देण्यात आला होता. त्या आगीत चित्रीकरणाचे अनेक सेट, यंत्रसामुग्री, त्याचबरोबर तयार झालेल्या चित्रपटाच्या प्रिंट्स देखील जळून खाक झाल्या होत्या. भालजी पेंढारकरांना यामध्ये मोठं नुकसान सहन करावं लागलं.
भालजींनी या सर्व अडचणीतून बाहेर पडण्याचा बराच प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी जे कर्ज घेतलं ते फेडण्यासाठी हा स्टुडिओ अक्षरश: लिलावात काढावा लागणार अशी परिस्थिती होती. हा स्टुडिओ विकला जाऊ नये यासाठी तो लता मंगेशकर यांना विकण्यात आला. त्यामुळे लतादीदींकडं या स्टुडिओची मालकी आली,' अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.
लतादीदींची काय होती इच्छा?
जयप्रभा स्टुडीओबाबत लता मंगेशकर यांच्याबद्दलची एक वेगळी प्रतिमा जनमानसात तयार झाली आहे. पण, लतादीदींनी याबाबत त्यांची इच्छा मला बोलून दाखवली होती, असं कुलकर्णी यांनी सांगितलं.
'सध्या चित्रिकरणाचं तंत्र बदलत चालले आहे. स्टुडिओत असलेल्या जुन्या यंत्र सामुग्रीवर चित्रीकरण होणे शक्य नाही. त्याला भाडे देखील मिळणार नाही. वयोमानानुसार दरवर्षी स्टुडिओच्या फक्त दुरुस्तीसाठी काही लाख रुपये खर्च करणे देखील शक्य नाहीय स्टुडीओला एवढ्या मोठ्या जागेची गरज नाही. त्यामुळे स्टुडिओचे दोन मजले आणि पाऊण एकर जागा तशीच ठेवायला मी तयार आहे. तिथे चित्रपटनिर्मिती सुरूच राहील.
लतादीदींनी 'या' शहरातून केली होती गायनाची सुरूवात, पाहा Video
उर्वरित जागेवर चित्रपट निर्मितीच्या काही गोष्टींसाठी पैसा उभा करण्याकरिता मला काय ते करु द्या, असे लता मंगेशकर यांचे मत होते,' असं कुलकर्णी सांगतात. आम्ही स्टुडीओ व्यवस्थित चालवू, अशा योजना मांडणारे चित्रपट महामंडळ किंवा चित्रपट व्यावसायिक संस्था, संघटना असे कोणतेच विश्वासार्ह पर्याय माझ्यासमोर आले नाहीत, असे देखील लतादीदींनी त्यांना सांगितलं होतं.
जयप्रभा स्टुडिओत चित्रीकरण होत नसतानाही लतादीदी लाखो रुपये देखभाल करण्यासाठी खर्च करत होत्या. त्यानंतरही त्यांच्यावर टीका झाली. पण, प्रत्यक्षात भालजी पेंढारकरांची इच्छा होती, तशीच मूळ जागेमध्ये चित्रपट निर्मिती संबंधित काम व्हावं अशीच लता मंगेशकर यांची इच्छा होती, असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Kolhapur, Lata Mangeshkar, Local18