Home » Tag » Lata Mangeshkar
Lata Mangeshkar - लता मंगेशकर

Lata Mangeshkar - लता मंगेशकर

    भारताची गानकोकिळा (India’s nightingale) म्हणून ओळखल्या जाणाऱ्य़ा अद्वितीय प्रतिभेच्या गान सम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar 1929 – 2022) यांची कारकीर्द 7 दशकांहून अधिक काळ व्यापणारी होती. त्यांनी हिंदी चित्रपटांची पार्श्वगायिका म्हणून अभूतपूर्व यश मिळवलं. किमान 36 भाषांमध्ये त्यांनी 30 हजारांहून अधिक गाणी गायली. देशा-विदेशात मोठमोठे सन्मान मिळवले. पण त्यांचं बालपण फारच खडतर अवस्थेत गेलं होतं. कुटुंबाच्या जबाबदारीसाठी त्यांना खूप लहान वयात काम सुरू करावं लागलं. लता मंगेशकर यांचं आयुष्य (Life story struggle of Lata Mangeshkar)

    28 सप्टेंबर 1929 रोजी तत्कालीन इंदोर संस्थानात जन्म झालेल्या लतादीदी मंगेशकरांच्या घरातलं थोरलं अपत्य. हेमा हे त्यांचं जन्मनाव. पुढे संगीत नाटकातल्या लतिकेच्या भूमिकेवरून तिला लता नाव मिळालं आणि तेच पुढे अजरामर झालं. पाचव्या वर्षापासून लता मंगेशकर गाणं शिकू लागल्या. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचं या आपल्या थोरल्या लेकीवर जीवापाड प्रेम. तिच्यातली गानप्रतिभाही त्यांनी खूप लहानपणीच हेरली. पण दुर्दैवाने पं. दीनानाथ मंगेशकर यांना लवकर देवाज्ञा झाली आणि 13 व्या वर्षीच लतादीदीवर 3 लहान बहिणी एक भाऊ आणि विधवा आईची जबाबदारी येऊन पडली.

    1945 मध्ये लतादीदी मुंबईत आल्या आणि पार्श्वगायनाचं क्षेत्र त्यांच्यापुढे खुलं झालं. मग त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. अक्षरशः हजारो गाणी त्यांनी गायली. हिंदी-मराठीच नव्हे तर 36 भारतीय भाषांतली गाणी लतादीदींनी गायली.

    2001 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला. त्यापूर्वी त्या  चित्रमहर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराच्याही मानकरी ठरल्या होत्या. याखेरीज फ्रेंच आणि ब्रिटीश सरकारचे सर्वोच्च नागरी सन्मानही लता मंगेशकर यांना मिळाले.