सुशील राऊत, प्रतिनिधी
औरंगाबाद, 6 फेब्रुवारी : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी त्यांच्या स्वर्गीय आवाजाच्या जोरावर अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. लता मंगेशकर त्यांच्या साध्या राहणीसाठीही ओळखल्या जात. औरंगाबादचे प्रसिद्ध फोटोग्राफर किशोर निकम यांनाही लतादीदींचा सहवास मिळाला होता. त्यांना 24 तासांमध्ये लतादीदींचे 800 पेक्षा जास्त फोटो काढण्याची संधी मिळाली होती. लतादीदींच्या पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्तानं निकम यांनी त्या आठवणींना उजाळा दिला.
कशी मिळाली संधी?
किशोर निकम यांचं शालेय शिक्षण औरंगाबाद शहरातील विज्ञान वर्धनी शाळेत तर महाविद्यालयीन शिक्षण कला महाविद्यालयात झालं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी पत्रकारितेची पदवी पूर्ण केलीय. त्यानंतर शासकीय कला महाविद्यालयातून फोटोग्राफीचा कोर्स केला आहे. पत्रकारिता आणि फोटोग्राफी या दोन्ही क्षेत्रांमध्ये निकम यांनी ठसा उमटवला आहे.
पत्रकारिता आणि फोटोग्राफी या क्षेत्रात त्यांना 25 वर्षांचा अनुभव आहे. किशोर निकम यांची उत्तम फोटोग्राफीमुळे चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र आहिरे यांची चांगली ओळख आहे. आहिरे यांच्यामुळेच त्यांना लतादीदींचे फोटो काढण्याची संधी मिळाली होती.
लतादीदींनी 'या' शहरातून केली होती गायनाची सुरूवात, पाहा Video
कसा होता अनुभव?
8 डिसेंबर 2014 रोजी गजेंद्र आहिरे यांनी निकम यांना फोन करुन मैत्र जीवांचे या अल्बसाठी लतादीदींचे फोटो काढायचे आहेत. त्यासाठी पुण्याला येण्याचे आमंत्रण दिले. निकम यांनी ही ऑफर एका क्षणाचाही विचार न करता स्वीकारली. भारतरत्न मिळालेल्या व्यक्तीचे फोटो काढायचे असल्यानं निकम संपूर्ण तयारीनीशी पुण्याला गेले. त्यांनी आपत्कालीन परिस्थितीसाठी आणखी दोन कॅमेरे सोबत घेतले होते.
'लतादीदींचे फोटो काढायचं दडपण त्यांच्यांवर होते. फोटो काढण्यापूर्वी आम्ही सर्वांनी दीदींना नमस्कार केला. आमच्यापेक्षा जास्त वाकून दीदींनी आम्हाला नमस्कार केला. समोरच्या व्यक्तीला आदर देण्याची त्यांची माणुसकी आम्हाला यावेळी दिसली,' असं निकम यांनी सांगितलं.
आलिशान घर अन् गाड्या; लतादीदी मागे सोडून गेल्या 'इतकी' संपत्ती; आता कोण आहे वारसदार?
लतादीदींनी मला सॉरी म्हटलं....
'फोटोशूट सुरू झाल्यावर सुरूवातीला दडपण होतं. पण, दीदींच्या बोलण्याचं ते कमी झालं. माझ्यासाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. त्यामुळे मी मिळेल त्या अँगलनं फोटो काढत होतो. एक गाणं सुरू असताना मी त्यांचे फोटो काढले त्यावेळेस त्यांची जीभ त्यांच्या दातांच्या खाली आली. त्यामुळे तो फोटो खराब झाला असेल हे दीदींच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी मला सॉरी म्हटंल. त्याचबरोबर पुन्हा फोटो काढण्यास सांगितलं,' असं अनुभव निकम यांनी सांगितला.
भारतरत्न लता मंगेशकर यांचे फोटो काढणे ही माझ्यासाठी पर्वणी होती. तो क्षण आयुष्यात पुन्हा कधीही येणार नव्हता. तो माझ्यासाठी खूप महत्त्वचा दिवस होता. मला 24 तासांचा वेळ मिळाला होता. त्या कालावधीमध्ये मी मिळेल तो क्षण कॅमेऱ्यात कैद करत होतो. लता मंगेशकर यांनीही मला संपूर्ण सहकार्य केलं. त्यावेळी डिजिटल कॅमेऱ्याला नुकतीच सुरुवात झाली होती. माझ्याकडं तो कॅमेरा होता. तो कॅमेरा कसा चालतो याची संपूर्ण माहिती लतादीदींनी माझ्याकडून घेतली,' असं निकम यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Lata Mangeshkar, Local18