साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 22 एप्रिल : सध्या हवामानात सातत्याने बदल होत आहे. पुढच्या काही दिवसात कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यात कमाल व किमान तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतपिकाची योग्य काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी कोल्हापुर च्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांना काही सूचना करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान यामध्ये पुढील काही दिवसांबद्दलचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कसे असेल हवामान? कोल्हापूर येथील केंद्राला प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये दिनांक 22 ते 26 एप्रिल दरम्यान आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. मात्र त्याचबरोबर दिनांक 22, 24, 25, 26 एप्रिल रोजी काही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची देखील शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान 36° ते 38° सेल्सिअस, तर सांगली जिल्ह्यात कमाल तापमान 38° ते 40° सेल्सिअस, त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात कमाल तापमान 37° ते 38° सेल्सिअस, तसेच कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील किमान तापमान अनुक्रमे 23° ते 24°, 21° ते 22°, 19° ते 20° सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये अनुक्रमे वाऱ्याचा वेग ताशी 12 किमी पर्यंत, 11 ते 16 किमी आणि 10 ते 15 किमी दरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. स्वतःची आणि आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी दरम्यान हवामान कोरडे असताना पक्व फळांची तसेच भाजीपाला पिकांची काढणी करावी, तर तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याने काढलेली फळे तसेच भाजीपाला सुरक्षित ठिकाणी ठेवावा. तसेच कमाल तापमान वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी प्रखर सूर्यप्रकाशात काम करणे टाळावे, तसेच स्वतःची आणि आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी, असं आवाहन देखील करण्यात आले आहे.
Latur News: लातूरचा रेन्चो! ठिबक सिंचनासाठी लावलं डोकं, Video पाहून म्हणाल क्या बात है
या पिकांची घ्या काळजी ऊस - सध्या सुरु असलेल्या ऊस लागवडीस 12 ते 16 आठवडे झाले असल्यास रासायनिक खतांचा तिसरा हप्ता नत्र 25 किलो प्रती हेक्टर (युरिया 54 किलो प्रती हेक्टर) या प्रमाणात द्यावा. उसावरील खोड किडीच्या नियंत्रणासाठी 5 गंध सापळे (ई.एस.बी.पुर) प्रती हेक्टर याप्रमाणात लावावेत. उस पिक हे तणविरहीत ठेवावे नारळ - उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याने नवीन लागवड केलेल्या नारळ रोपांना शेडनेटच्या सहाय्याने सावली तयार करावी. कांदा - पक्व झालेल्या कांदा पिकाची काढणी करून घ्यावी व तयार शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. दरम्यान कांदा पिकाची काडणी करून कांदा 3 ते 5 दिवस शेतात सुरक्षित ठिकाणी सुकवावा. तर कांद्याची पात कापतेवेळी 2.5 ते 3 सेमी पात ठेऊन कापावी. पात कापलेला कांदा 15 ते 20 दिवस सावलीमध्ये आणि प्रतवारी करून मध्यम आकाराचा कांदा सावलीमध्ये सुकवावा. आंबा - आंबा पिकामध्ये तयार झालेली फळे नुतन झेल्याच्या सहाय्याने 80 ते 85 टक्के तेल काढावीत कमी केलेली फळे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आणि फळामध्ये साका तयार होण्याचे टाळण्यासाठी काढलेली फळे सावलीत ठेवावीत. शक्यतो वाहतुक रात्रीच्यावेळी करावी व फळे काढणीच्या किमान 8 दिवस अगोदर झाडावर कोणतेही औषध फवारू नये. तर पाऊस तसेच गारपिटीमुळे फळगळ झालेली असल्यास खराब फळे गोळा करून नष्ट करावीत.
कधी मिळणार नवं शिकण्याची संधी? 4 वर्षांपासून शेतकऱ्यांना सतावतोय ‘तो’ प्रश्न
पपई - मावा किडीमुळे वर विमाणूजन्य रोगाचा प्रसार जास्त होतो म्हणून मावा कीड नियंत्रण करणे महत्वाचे असते. मावा किडीचा प्रादुर्भाव झाल्यास नियंत्रणासाठी पपई आडावर निमार्क 10 मिली प्रती 10 लिटर पाण्यातून फवारावे. द्राक्ष - पक्क झालेल्या द्राक्ष घडांची काढणी करून घ्यावी. एप्रिलमध्ये छाटनिची पूर्व तयारी सुरु करावी. डाळिंब - हस्त-बहार फळे पक्व झाल्यास तोडणी आणि तोडणी नंतर झाडांना विश्रांती. तर जरा उशिरा हस्त बहार घेतलेला असेल तर फळांना बटर पेपर बॅगने झाकून पिशवी चे खालचे तोंड उघडे ठेवावे किंवा डाळिंब झाडांची पूर्ण ओळ झाकण्यासाठी क्रॉपकव्हरचा वापर करावा. डाळिंब फळांवरील ऊनचट्टा (सन बर्न व सन स्काल्ड) चा प्रादुर्भावान्यासाठी कॉपकव्हरने झाडांची पूर्ण ओळ झाडांच्या दोन्ही बाजूस 1.5 ते 2.0 फुट झाकावी. जनावरे - उन्हाची तीव्रता असल्याने जनावरांना दुपारच्या वेळी सावलीमध्ये बांधावे. तसेच त्यांना शुद्ध स्वच्छ आणि थंड पाणी पिण्यास द्यावे. पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार शेळयांना स्टुगाईल (गोलकृमी) या जंताच्या निर्मुलनासाठी एप्रिल महिन्यामध्ये फनबेन्डाझील हे जंतनाशक द्यावे. म्हशींमध्ये घर्मग्रंथी कमी असल्यामुळे घामातून त्याच्या शरीरातून उष्णतेचे उत्सर्जन होत नाही त्यामुळे म्हशींना पाण्यात डुंबू द्यावे. ओले कापड किंवा गोणपाट भिजवून ते गाईच्या पाठीवर ठेवावे. (टीप : वरील सर्व माहिती ग्रामीण कृषि मौसम सेवा ऐएमएफयु कोल्हापूर, विभागीय कृषि संशोधन केंद्र, शेंडा पार्क, कोल्हापूर यांच्याकडून देण्यात आली आहे.)