ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 22 एप्रिल: शेतीच्या यांत्रिकीकरणात शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती हा मोठा अडथळा आहे. तरीही गरज ही शोधाची जननी म्हटले जाते, त्याप्रमाणे शेतकरी आपल्या शेतात गरजेनुसार वेगवेगळे जुगाड करत असतो. लातूर जिल्ह्यातील सुरेश कोतापुरे यांनी झाडांना पाणी देण्यासाठी असेच एक भन्नाट जुगाड केले आहे. त्यांनी चक्क माठापासून ठिबक सिंचन तयार केले आहे. विशेष म्हणजे हे जुगाड अनेकांना फायदेशीर ठरत असून त्याला मागणीही आहे. सुरेश कोतापुरे यांचा जुगाड कोतापुरे यांच्या मित्राने शेतातील बांधावर आंब्याची रोपे लावली आहेत. जवळ पाण्याची सोय नसल्याने खांद्यावरून पाणी आणून झाडांना द्यावे लागत होते. त्यावर उपाय म्हणून कुंभार व्यवसाय करणाऱ्या सुरेश यांनी देशी जुगाड केले. त्यांना माठालाच ड्रिपचे साहित्य बसवून ठिबक सिंचन तयार केले. त्यांची ही नामी शक्कल उपयुक्त ठरली असून त्याद्वारे 16 रोपट्यांना पाणी पुरवले जात आहे.
घरगुती वापराचा माठ बनला ड्रीपचा ड्रम ठिबक सिंचनाचा उपयोग मोठे शेतकरी हे पाण्याची बचत करण्यासाठी करतात. याचप्रमाणे भारतीय पद्धतीचे जुगाड तयार करून सुरेश कोतापुरे यांनी घरगुती वापराच्या माठापासून ठिबक सिंचन तयार केले. माठातच पाण्याचा साठा केला जोतो व त्याला ड्रीपची नळी जोडून रोपांना पाणी सोडले जाते. एका माठाद्वारे चार झाडांना पाणीपुरवठा केला जातो. तर एका माठापासून चार झाडांचे ठिबक तयार करण्यासाठी 350 रुपयांचा खर्च येतो. माठापासून ठिबकमुळे पाण्याची बचत माठापासून तयार केलेल्या ठिबकमुळे पाण्याची बचत होते. 16 रोपांना सोळा घागरी याप्रमाणे जवळपास 300 ते 325 लिटर पाणी दररोज या झाडांना घालावे लागत होते. पण ठिबक सिंचनाच्या मार्फत हे काम फक्त चार घागरीमध्ये होत आहे. यामुळे पाण्याची बचत होते, असे संदीप जाधव यांनी सांगितले. Video : संपूर्ण देशात शिजणाऱ्या लातूरच्या डाळीचं वैशिष्ट्य माहिती आहे? देशी जुगाडाला शेतकऱ्यांकडून मागणी सुरेश यांनी माठापासून तयार केलेल्या ड्रीपला शेतकऱ्यांची मागणी आहे. आत्तापर्यंत पान चिंचोली व देवांग्रा या गावांमधील जवळपास पंधरा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या ठिबकचा प्रयोग केला आहे. यामधील पहिला प्रयोग संदीप जाधव यांच्या शेतामध्ये करण्यात आलेला आहे. अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे ठिबक सिंचन नसते. त्यामुळे त्यांनी बांधावर झाडे लावल्यास त्यांना खांद्यावर वाहून पाणी घालावे लागते. अशा पद्धतीने झाडांचे संगोपन करणे अडचणीचे ठरते. त्यासाठी माठाच्या ठिबकचा वापर केल्यास वेळ, श्रम आणि पैसा यांची बचत होत आहे.