कोल्हापूर, 02 नोव्हेंबर : कोल्हापूर आणि तांबड्या-पांढऱ्या रशाचे समीकरण हे सर्वांना माहिती आहे. त्याच पद्धतीची शाकाहारी दूध आमटी देखील ही कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील प्रसिद्ध आहे. दूध आमटी हा नवा वाटणारा प्रकार जरी शाकाहारी पदार्थ असला, तरी मांसाहारी लोकांच्या देखील दूध आमटी पसंतीस उतरत आहे. पण कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्याची ओळख असलेल्या दूध आमटी बद्दलची माहिती जास्त कोणालाच नाही आहे. चला तर याच दूध आमटी बद्दल जाणून घेऊया. काय आहे दूध आमटीचे वैशिष्ट्य? दुधापासून बनवलेली आमटी हेच या पदार्थाचे वैशिष्ट्य आहे. कारण दूध हे सहसा कुठल्याही मसाल्याच्या पदार्थासोबत मिसळल्यानंतर खराब होते. पण एका विशिष्ठ प्रकारे बनवलेली ही दूध आमटी अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट असते. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्याची ही स्पेशालिटी आहे. हा पदार्थ वेगळा आणि चविष्ट असल्यामुळे स्थानिकांबरोबरच आता दूरवरून येणाऱ्या पर्यटकांच्या देखील पसंतीसही उतरला आहे. हेही वाचा : कोल्हापुरी लड्डू पान लय भारी! काय आहे खासीयत पाहा VIDEO जवळपास 50-60 वर्षांपूर्वी प्रथम दूध आमटीची निर्मिती राधानगरी जवळ असणाऱ्या सोन्याची शिरोली या खेडेगावात जवळपास 50-60 वर्षांपूर्वी या पदार्थाची प्रथम निर्मिती झाल्याचे सांगितले जाते. तेथे असणाऱ्या जैन समाजातील कुटुंबांमध्ये दूध आमटी खूप पूर्वीपासून बनवली जात असे. त्यांच्यामुळे स्थानिक लोक देखील ही आमटी बनवू लागले आणि त्याचा आस्वाद घेऊ लागले. या पदार्थाने आता राधानगरी तालुक्यासह कोल्हापूर जिल्हा व जिल्ह्याबाहेरील अनेकांना आपल्या चवीची भुरळ पाडली आहे, असं राधानगरी येथील दूध आमटी बनवणारे अभिषेक निल्ले यांनी सांगितले. दूध आमटी बनवताना काय घ्यावी काळजी? आपण आमटी बनवण्यासाठी घेतलेलं भांडे हे स्वच्छ धुवून घ्यायला हवे. कारण आधी त्या भांड्यात बनवलेल्या पदार्थाचा जराही अंश शिल्लक असेल, तर ही दूध आमटी लगेचच खराब होऊन जाते. त्याचबरोबर या आमटीसाठी ताज्या दुधाचाच वापर करावा. हेही वाचा : Solapur : झोपडीतील चिवडा बनला मोठा ब्रँड, पाहा इंटरेस्टींग कहाणी Video कशापासून बनते ही दूध आमटी? दूध आमटी बनवण्यासाठी दूध, कांदा, बटाटे, तेल, चटणी आणि 14 वेगवेगळ्या मसाल्याचे मिश्रण लागते. सुरुवातीला हा दूध आमटीचा खास 14 मासाल्यांचे मिश्रण असलेला मसाला देखील घरी बनवून घ्यावा लागत असे. त्यावेळी याचे प्रमाण हे योग्यच ठेवावे लागत असे. पण आता दूध आमटीचा तयार मसाला कोल्हापुरातील बाजारात सहज मिळून जातो. दूध आमटी बनवण्यासाठी कृती 1) एक लिटर दुधाची आमटी बनवण्यासाठी दूध आमटीच्या तयार मसाल्याचे एक पाकीट घ्यावे. या तयार मसाल्यामध्ये लसुण, बारीक चिरलेला आणि भाजलेला थोडा कांदा, कोथिंबीर व थोडे दूध घालून पेस्ट करून घ्यावी. 2) गरजेनुसार प्रमाणात तेल भांड्यात तापवून घ्यावे. 3) त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. त्याचबरोबर बटाट्याचे बारीक काप त्यात घालावेत. गरजेनुसार लाल चटणी (साधी चटणी) घालावी. 2 मिनिट परतून घ्यावे. 4) तयार केलेली दूध आमटी मसाल्याची पेस्ट त्यामध्ये मिसळून वरून दूध ओतावे. 5) या सर्व मिश्रणाला चांगली उकळी द्यावी. बटाटे शिजल्यानंतर गॅस बंद करून चिरलेली कोथिंबीर टाकावी. 6) दुधाला उकळी यायच्या आधी दूध आमटीमध्ये मीठ टाकू नये. तर अशा सोप्या पद्धतीने तयार केलेली ही दूध आमटी चपाती, ब्रेड व भाताबरोबर देखील खाता येते. फक्त पिण्यासाठी पण ही अतिशय चविष्ट लागते. बटाट्याच्या कापामुळे या आमटीला एक वेगळी आणि छान चव येते. हेही वाचा : Video : निसर्गरम्य वातावरणात बसण्यासाठी खाट, ‘नेप्ती’च्या भेळचा आहे भारीच थाट! कुठे खायला मिळेल ही दूध आमटी ? राधानगरी तालुक्यातील मध्यवर्ती भागात ही दूध आमटी तुम्हाला कोणत्याही हॉटेलमध्ये किंवा घरगुती खानावळीत खायला मिळू शकते. कोल्हापुरातील नागरिकांसाठी स्पेशल राधानगरी पद्धतीने बनवलेली ही दूध आमटी कोल्हापूर शहर परिसरात देखील उपलब्ध करून दिली जात आहे. योगिराज पवार आणि देवेंद्र जाधव हे दोन राधानगरीकर युवक कोल्हापुरात दूध आमटी घरगुती पद्धतीने बनवून देत आहेत. योगिराज पवार - 9673747151 देवेंद्र जाधव - 9423838732
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.