कोल्हापूर, 06 सप्टेंबर : कोल्हापूर जिल्हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु शाहूंच्या कोल्हापूर जिल्ह्यात मान खाली घालावी अश्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील दऱ्याचे वडगाव येथे एक धक्कादाय घटना समोर आली आहे. अवघ्या 14 वर्षांच्या मुलीशी लग्न करत गरोदर केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान तिचे अवघ्या साडेबाराव्या वर्षात लग्न झाल्याचेही उघड झाले आहे. या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यात शाहू महाराजांनी घालून दिलेल्या शिकवणींना गालबोट लागत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी वेळी डॉक्टरांना शंका आल्याने त्यांनी अधिक तपासणी केली. यावरून बालविवाहाचा प्रकार उघड झाला आहे. या घटनेबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अल्पवयीन मुलीचा नवरा, आई, वडिलांसह पाच जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
हे ही वाचा : ससून रुग्णालयात गोळीबार आणि चालल्या तलवारी, कुख्यात गुंडावर जीवघेणा हल्ला, पुणे हादरलं
याबाबत ग्रामसेवकांनी पोलिसांना जबाब दिला आहे. ते म्हणाले कि, माझे दऱ्याचे वडगाव व वडवाडी गावात शासनाकडून वेळोवेळी आदेशाचे पालन करून शासनाकडून येणाऱ्या योजना राबविल्या जातात. तसेच मी दऱ्याचे वडगाव व वडवाडी गावात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम पाहत आहे. दरम्यान तपासणी दरम्यान मला एका अल्पवयीन मुलीवर संशय आल्याने मी तिला प्राथमीक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी लावून दिले यावेळी हा प्रकार उघडकीस आला.
हे थांबणार कधी…
लग्नाच्या वेळी मुलीचे वय 18 पेक्षा व मुलाचे वय 21 पेक्षा कमी असेल तर तो बालविवाह समजला जातो. लहान वयात लग्न झाल्याने मुलींच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. अशा सर्व कारणांमुळे बालविवाह प्रतिबंध कायद्यांची निर्मिती केली आहे; मात्र तरीही अनेक ठिकाणी बालविवाह होत आहेत. एक अवघड जबाबदारी, कौटुंबिक अडचणी, प्रेमप्रकरण, आर्थिक अडचणी अशा अनेक कारणांमुळे बालविवाह केले जातात. ते होऊ नयेत यासाठी पोलिस, महिला व बालविकास विभाग, बालकल्याण समितीसह सामाजिक कार्यकर्ते काम करत आहेत.
हे ही वाचा : गणपती विसर्जन करताना तरूण नदीत बुडाला, इचलकरंजीचे लोकप्रतिनीधी जबाबदारी घेणार का?
एवढी यंत्रणा असतानाही बालविवाहाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या सर्व यंत्रणांनी आपापली जबाबदारी पार पाडत असताना योग्य समन्वय ठेवणे व दोषींवर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करणे आवश्यक आहे; मात्र सध्या तरी तसे दिसत नाही. मागील दोन वर्षांत तर बालविवाहाच्या प्रकरणात गुन्हे नोंद होण्याचे प्रमाणही अल्प राहिले आहे. या सर्वांचा विचार करून पुढील धोरण ठरवणे आवश्यक आहे.