कोल्हापूर, 04 नोव्हेंबर : तंत्रज्ञानाचे युग हे सर्वांच्याच कल्याणाचे ठरत आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे अनेकानेक गोष्टी सुखकारक बनल्या आहेत. याच पैकी एक गोष्ट म्हणजे व्हॉट्सॲप ग्रुप. सध्या व्हॉट्सॲप ग्रुपचा एखाद्या समाजोपयोगी कामासाठी योग्यरित्या वापर होऊ लागला आहे. कोल्हापुरातील काही युवक अशाच व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून अनेकांचे प्राण वाचवण्याचे काम करत आहेत. गरजू रुग्णांना योग्य वेळात रक्त आणि प्लेटलेट्सचा पुरवठा ते व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून करत आहेत.
जेव्हा एखाद्या रुग्णाला रक्त किंवा प्लेटलेट्स चढवाव्या लागतात. तेव्हा त्यांच्या नातेवाईकांचा त्यासाठी शोध सुरू होतो. पण बऱ्याच वेळा त्या ब्लड ग्रुपचे रक्त किंवा प्लेटलेट्स उपलब्ध होत नाहीत. त्यावेळी रुग्णाला आणि नातेवाईकांना खूप त्रास सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी काही युवकांनी एकत्र येत एक व्हॉट्सॲप ग्रुप बनवला. ज्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा असे सर्व रक्तदाता ॲड होत गेले.
कोल्हापूरच्या रस्त्यावर अवतरली 'बांबूची दुनिया', घराच्या सजावटीसाठी मिळतीय पसंती, Video
400 हून अधिक रुग्णांना मदत
कोल्हापुरातील जवाहर नगर येथील रोहित कदम आणि शिवाजी पेठेतील धनंजय नामजोशी हे युवक रुग्णांसाठी मदत पुरवत आहेत. व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून ते तातडीने प्लेटलेटस् देऊन रुग्णांना जीवदान देण्याचे कार्य करत आहेत. रोहित यांनी आजपर्यंत 400 हून अधिक तरुणांच्या माध्यमातून प्लेटलेटस् देऊन रुग्णांना जीवदान देण्याचे काम केले आहे. नामजोशी यांनीही तरुणांच्या माध्यमातून 137 जणांना प्लेटलेटस् मिळवून देत रुग्णांना आधार दिला आहे.
ब्लड@24*7 SDP ग्रुपच्या माध्यमातून मदत
सिंगल डोनर प्लेटलेट्स (SDP) बाबत नागरिकांमध्ये जनजागृती नसल्यामुळे डेंग्यू, कॅन्सर, लेफ्टो, मलेरिया अशा अनेक वेळी जेव्हा या SDP बॅगची गरज असते. पण ती वेळेवर त्यांना मिळत नाही. यासाठीच गेल्या काही वर्षांपासून आम्ही ब्लड@24*7 SDP ग्रुपच्या माध्यमातून प्लेटलेट्स आणि रक्त पुरवण्याचे काम करत आहोत. या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये जोडल्या गेलेल्या प्रत्येक डोनरचे ब्लड ग्रुप प्रमाणे वर्गीकरण केलेले आहे. त्यानुसार कोल्हापूर, सातारा, सांगली आदी ठिकाणचे देखील सगळ्या ब्लड ग्रुपचे डोनर आमच्या ग्रुप मध्ये आहेत. त्यामुळे रुग्णांना नक्कीच मदत होत आहे, असं ब्लड@24*7 SDP ग्रुपचे अॅडमिन धनंजय नामजोशी सांगतात.
Sangli : बेघरांसाठी मायेची 'सावली', शेकडो जणांना मिळाला आधार, पाहा Video
या ग्रुपमध्ये रात्री-अपरात्री देखील गरजूंना प्लेटलेटस् देण्याची तयारी दर्शवणाऱ्या तरुणांना सहभागी करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या रोहित कदम यांच्या ग्रुपमध्ये रक्तगटनिहाय प्लेटलेटस् देणारे 100 जण, तर धनंजय नामजोशी यांच्याही ग्रुपमध्येही रक्तगटनिहाय 397 जण सहभागी आहेत. ह्या प्रमुख 8 रक्तगटांचे स्वतंत्र ग्रूप बनवण्यात आले आहेत. त्याबरोबरच SDP (Single Donor Platelet) आणि महिला रक्तदात्यांसाठी स्वतंत्र व्हॉट्सॲप ग्रूप देखील बनवण्यात आला आहे.
मदत आम्हाला या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून होते
रक्तात लाल पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स असे 3 घटक असतात. थॅलेसेमिया, डेंग्यू अशा अनेक रुग्णांना यांची गरज भासते. यासाठी आपल्याला वेळोवेळी डोनरची आवश्यकता असते आणि ती मदत आम्हाला या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून होत आहे, असं रक्तविकार तज्ञ, आणि ब्लड कॅन्सर तज्ञ डॉ. वरुण बाफना सांगतात.
माझी मुलगी ज्यावेळी आजारी होती त्यावेळी तिच्यासाठी मला प्लेटलेट्सची खूप गरज होती. त्यावेळेला मी खूप हैराण झालो होतो. मी अनेक ठिकाणी ब्लड बँकेत वगैरे गेलो होतो पण मला लवकर मदत मिळेल अशी आशा नव्हती. तेव्हा मला एका पत्रकार मित्राने धनंजय आणि त्यांच्या ग्रुप बद्दल सांगितले. मी धनंजय यांना कॉन्टॅक्ट केला. त्यांच्या मदतीमुळे आज माझ्या मुलीचे प्राण वाचले आहेत. त्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी राहीन,असं मदत प्राप्त झालेले अंकुश निपाणीकर सांगतात.
मानवतेचा धर्म : गरजूंना मोफत अन्नदान करणारे नाशिकचे योगेश कापसे पाहा Video
अशाच प्रकारचा अनुभव अनेकांचा आहे. कारण गरजेवेळी अशा प्रकारे मदतीसाठी धावून येणे, हे खूप महत्त्वाचे असते. त्याचबरोबर या ग्रुपमध्ये असणाऱ्या सर्व डोनर लोकांचे देखील अनेकांनी आभार मानले आहेत. जर कुणाला SDP किंवा प्लेटलेट्स बॅगची गरज भासली. तर त्यांना मदत केली जाईल. त्यासाठी +919923167554 या नंबरवर फोन करण्याचे आवाहन ब्लड @24*7 SDP ग्रुपचे धनंजय नामजोशी यांनी सांगितले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur, Local18, Technology, Whatsaap