कल्याण, 10 जून : तांत्रिक बिघाडामुळे तब्बल 2 तास लिफ्टमध्ये अडकून पडलेल्या 3 चिमुरड्यांची कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाने अवघ्या काही मिनिटांत सुटका केली. कल्याण पश्चिमेतील टिळक चौक परिसरात हा प्रकार घडला.
टिळक चौकात असणाऱ्या खेडा अव्हेन्यू नावाच्या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर 09 जून रोजी संध्याकाळच्या सुमारास 3 मुलं अडकून पडली. यामध्ये 4 वर्षांची मुलगी आणि 8 तसंच 12 वर्षांच्या दोन मुलांचा समावेश होता. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे काहीही केल्या या लिफ्टचा दरवाजाच उघडत नव्हता. त्यामुळे सोसायटीने सुरुवातीला संबंधित लिफ्ट कंपनीच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना बोलवून प्रयत्न करून पाहिले.
मात्र, तांत्रिक बिघाड शोधण्याचे अनेक प्रयत्न करूनही या कर्मचाऱ्यांना काही केल्या हा दरवाजा उघडता आला नाही. त्यानंतर अखेर कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाला याठिकाणी बोलवण्यात आले.
हेही वाचा -पुण्यात भीषण अपघात! भरधाव कार पडली विहिरीत, आईसह दोन चिमुरड्यांचा करुण अंत
महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी कोणताही वेळ न दवडता हायड्रॉलिक उपकरणाच्या सहाय्याने अवघ्या काही मिनिटांत लिफ्टचा दरवाजा उघडला आणि या तिन्ही मुलांची सुटका केली.
हेही वाचा -टीव्हीवर कार्टून बघण्यास आईनं केला विरोध, पुण्यात 14 वर्षीय मुलानं घेतला गळफास
ही मुलं सुखरूपपणे बाहेर आल्यानंतर त्यांच्या पालकांनी आणि इतर रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडत अग्निशमन दलाचे आभार मानले. कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाचे मुस्ताक मकानदार, विनायक लोखंडे यांच्यासह रमेश दिघे, निखिल ईसामे, मोनिश पाटील या जवानांनी हे रेस्क्यू ऑपरेशन केले.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.