मुंबई, 3 जूलै : अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड करण्यात आली आहे. आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोठा दावा केला आहे. अजित पवारांसोबत जे आमदार गेले आहेत, त्यातील 9 सोडले तर सर्व जण आमच्या संपर्कात असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. अमोल कोल्हे काल अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. मात्र आज त्यांनी ट्विट करत आपण शरद पवार यांच्यासोबतच असल्याचं सांगितलं आहे. यावरून देखील आव्हाड यांनी जोरदार टोला लगावला आहे. शरद पवार यांच्या समर्थनार्थ आणखी एक जण बाहेर पडले आहेत, ते म्हणजे अमोल कोल्हे. अमोल कोल्हे यांना फसवून नेण्यात आलं होतं असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
दरम्यान आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावरून देखील आव्हाड यांनी टोला लगावला आहे. विधानसभा अध्यक्ष कधी कोणाच्या घरी जात नाहीत, अध्यक्ष बायस नसतात. विधानसभा अध्यक्षांनी कसं वागावं यांची संहिता आहे. त्यांनी कोणाला झुकते माप देऊ नये असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.