Inside Story: सांगलीत नेमकं काय घडलं? भाजपकडे बहुमत असूनही राष्ट्रवादीचा महापौर आला निवडून

Inside Story: सांगलीत नेमकं काय घडलं? भाजपकडे बहुमत असूनही राष्ट्रवादीचा महापौर आला निवडून

सांगलीत भाजपचं संख्याबळ जास्त होतं. त्यांचे नगरसेवक अधिक होते, तरी प्रत्यक्षात या महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर निवडून आला. हे कसं शक्य झालं?

  • Share this:

सांगली, 23 फेब्रुवारी: देशाचं लक्ष गुजरातच्या स्थानिक निवडणुकांकडे असलं तरी महाराष्ट्रात सांगली मिरज-कुपवाड महापालिकेच्या (Sangli Miraj Kupwad Municipal Corporation)  महापौरपदाच्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष होतं. सांगलीत भाजपचं संख्याबळ जास्त होतं. त्यांचे नगरसेवक अधिक होते, तरी प्रत्यक्षात या महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर निवडून आला. हे कसं शक्य झालं?

वास्तविक सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत 78 जागा असून  महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक मंगळवारी झाली. वास्तविक या महापालिकेत 78  पैकी भाजपकडे सर्वाधिक 41 जागा आहेत.  वास्तविक या काँग्रेसकडे 19 आणि राष्ट्रवादीकडे फक्त 15 जागा असल्या तरी अखेर महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दिग्विजय सूर्यवंशी (Digvijay Suryavanshi) यांनी बाजी मारली आहे. भाजपला धक्का देत राष्ट्रवादीचा महापौर निवडून आला. भाजपचे महापौरपदाचे उमेदवार धीरज सूर्यवंशी (Dhiraj Suryavanshi) फक्त 3 मतांनी हरले.

कोरोना रुग्ण वाढत असल्याने या निवडणुकीसाठीचं मतदान ऑनलाइन घेण्यात आलं. सकाळी 11 वाजता मतदान झालं आणि त्यात भाजपची 5-6 मतं फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश आलं. काही नगरसेवक शेवटपर्यंत नॉट रीचेबल राहिले. त्याचा फायदा राष्ट्रवादीला झाला. दिग्विजय सूर्यवंशी यांना 39 तर भाजपच्या धीरज सूर्यवंशींना 36 मतं मिळाली आणि महापौरपदाची माळ राष्ट्रवादीच्या दिग्विजय यांच्या गळ्यात पडली.

नेमकं काय झालं?

भाजपच्या 5 नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केलं. भाजपचे विजय घाडगे, महेंद्र सावंत, स्नेहल सावंत, अपर्णा कदम आणि नसीमा नाईक या भाजपा नगरसेवकांनी  राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांना मतदान केल्याने राष्ट्रवादीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.

वाचा - ठाकरे सरकारचा मोदी सरकारला जोरदार झटका; Coronil बाबत घेतला मोठा निर्णय

या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी जातीने लक्ष घालत प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यांच्या या होम ग्राउंडवर त्यांनी अखेर बाजी मारली. भाजपची मदार त्यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर होती. पण दादांना सांगलीचा गड राखूनही खुर्ची मिळवता आली नाही.

First published: February 23, 2021, 5:07 PM IST

ताज्या बातम्या