नेहाल भुरे, प्रतिनिधी
भंडारा, 14 जुलै : नादुरुस्ती स्थितीमध्ये उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव येणाऱ्या ट्रॅव्हल्सने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. (Bhandara Accident) ही घटना भंडारा साकोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 मोहघाट जंगल परिसरामध्ये घडली. झालेल्या भीषण अपघातात ट्रॅव्हल्समधील चालक क्लिनरचा जागीच मृत्यू झाला आहे. आज सकाळच्या दरम्यान ही घटना घडली. दरम्यान झालेल्या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतून खोळांबली आहे. याचबरोबर चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू झाल्याने स्थानिकांनी हळहळ व्यक्त केली.
रायपूरवरून निघालेली हंसा ट्रॅव्हल्स नागपूरकडे भरधाव जात असताना उभ्या असलेल्या ट्रकला भीषण धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात ट्रॅव्हल्सच्या समोरील भाग चक्काचूर झाला. दरम्यान ट्रॅव्हल्समधील जखमी प्रवाशांना साकोली येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ट्रॅव्हल्समध्ये जखमी झालेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरून वाहतूक संत गतीने सुरू आहे.
हे ही वाचा : नको ते धाडस करू नका! पूर पाहण्यास गेले अन् 5 तरुण नाल्यात वाहून गेले
भंडारा जिल्ह्यात पावसाने जनजीवन विस्कळीत
भंडारा जिल्ह्यात सतत धो-धो बरसणाऱ्या पावसाने अतिवृष्टीची नोंद झाली असून मागच्या 24 तासांत तब्बल 95.8 मिमी पाऊस झाला आहे. गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने या प्रकल्पाचे सर्व 33 दरवाजे बुधवारी एक मीटरने उघडण्यात आले. तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरातील 25 घरांमध्ये पाणी शिरले असून भंडारा ते तुमसर राज्यमार्ग आणि भंडारा ते बालाघाट महामार्ग ठप्प झाला आहे.
हे ही वाचा : Kolhapur Pavankhind : पावनखिंडवर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना शिवभक्तांनी चांगलाच चोपला Video Viral
गत २४ तासांत जिल्ह्यात १४८ मिमी इतका सर्वाधिक पाऊस तुमसर तालुक्यात झाला असून, लाखांदूर १३५ मिमी, साकोली ११५ मिमी, पवनी १०६.२ मिमी, मोहाडी ९०.४ मिमी, लाखनी ५९.४ मिमी आणि भंडारा तालुक्यात १६.४ मिमी पावसाची नोंद झाली. मोहाडी, तुमसर, पवनी, साकोली, लाखांदूर या पाच तालुक्यातील २५ मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. तुमसर तालुक्यातील गोंदेखारी आणि गोंडीटोला गावातील अनेक घरात पुराचे पाणी शिरले आहे. अनेक शेतातील बांधांमध्ये पाणी साचल्याने धान पीक धोक्यात आले आहे.