हिंगणघाट : पुरुषत्वाच्या भ्रामक कल्पना आपण कधी सोडणार? स्त्रीच्या निर्णयस्वातंत्र्याचा आदर कधी करणार?

हिंगणघाट : पुरुषत्वाच्या भ्रामक कल्पना आपण कधी सोडणार? स्त्रीच्या निर्णयस्वातंत्र्याचा आदर कधी करणार?

हिंगणघाट घटनेतल्या पीडितेच्या मृत्यूने महाराष्ट्र सुन्न झाला आहे. पण आता महाराष्ट्राला गरज आहे पितृसत्ताक मानसिकतेतून निर्माण झालेल्या पुरुषत्वाच्या भ्रामक कल्पना तोडण्याची. स्त्रिला व्यक्ती म्हणून स्वीकारण्याची, तिच्या निर्णयस्वातंत्र्याचा आदर करण्याची.

  • Share this:

रिंकू पाटील, विद्या प्रभुदेसाई, जान्हवी तुपे, अमृता देशपांडे, वीणा देशमुख, वैशाली पाटिल, अनिता श्रीखंडे, साधना जाधव आणि आता हिंगणघाटातील पीडिता… नावं बदलतात, ठिकाणं बदलत जातात, हिंसाचाराचं स्वरूप बदलतं, पण पितृसत्ताक मानसिकतेत होरपळणाऱ्या स्त्रियांची संख्या काही केल्या कमी होत नाही. कधी जाळून, कधी मारून तर कधी बदनामी करून तिचा व्यक्ती म्हणून जगण्याचा हक्कच पुरुषी सत्ता नाकारत आहे.

हिंसाचाराला अधिमान्यता देणारा समाज अशा घटना झाल्यावर पेटून उठतो, उद्रेक करतो, कायदे कडक करण्याची मागणी करतो. पण अशा घटना होऊच नाही म्हणुन घटनेच्या मुळापर्यंत जाऊन समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतांना दिसत नाही, हे समाजाचे दुर्दैव आहे.

पुरुषप्रधान व्यवस्था ही पुरुषांना प्राधान्य देते. तर स्त्रीला कायम दुय्यमस्थानी ठेवते. घरात आणि दारात ही व्यवस्था इतकी मजबूत आहे की, स्त्रियांना नकाराचा अधिकार आहे, हे सोयीस्करपणे विसरले जाते. त्या नकाराची परिणती मग तिच्यावरच्या अन्यायात होते. कधी तो तिच्या जीवावरही उठतो. जे आपल्या उपयोगात नाही, आज्ञेत नाही, ते संपवून टाकण्याच्या पुरुषी मानसितेची बळी कायम स्त्री ठरत असते. हिंगणघाटमधील घटना ही त्याच वळणावरची आहे.

प्रेम होते, नव्हते, प्रेम एकतर्फी होते, यापेक्षा ती मुलगी एक स्त्री होती, हाच तिचा दोष ठरला का? असे प्रश्न आजच्या समाजव्यवस्थेने निर्माण केले आहे.

खाजगी संपत्तीच्या उगमाबरोबर स्त्रियांवर मालकी गाजवणारी पितृसत्ता कायम आपल्या वर्चस्वसाठी स्त्रियांच्या लैंगिकतेवर, श्रमावर, बुद्धिमत्त्तेवर आणि साधन सामग्रीवर मालकी हक्क गाजवतांना दिसते. पुरुषप्रधानता ही समाजातील एक शोषणाची व्यवस्था आहे. यात स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन भोगवादी आहे.

संबंधित - पीडितेचा मृत्यू: 'HYD एन्काउंटर'च्या समर्थनाची वेळ येऊ देऊ नका - मकरंद अनासपुरे

स्त्री-पुरुष संबंध हे प्रत्येक काळात बदलतात. त्याबरोबर पितृसत्तेचे स्वरुपही बदलते. पण ते नष्ट होत नाही, किंबहुना ते नष्ट व्हावे असे प्रयत्न कुठलीच व्यवस्था करताना दिसत नाही. त्या व्यवस्थेचे लाभ हे प्रत्येक पुरुषाला हवेच असतात. म्हणून धर्मव्यवस्था, शासन, प्रशासन, कायदे व्यवस्था, राजकारण अशा कुठल्याच व्यवस्थेत याविषयी बदल केला जात नाही. अशा घटना घडल्यानंतर केवळ दबावगट म्हणुन या व्यवस्था काम करतांना दिसतात.

आपल्या समाजात स्त्रीस्वभावाला वळण लावण्यासाठी कायम हिंसेचा वापर केला जातो. याची सुरुवात आधी घरातूनच होते. वडील, भाऊ असो की काका, आपल्या घरातील इज्जत, संस्कार या नावाखाली स्त्रियांवर हिसांचार करत राहतात. तिचे घरातील सदस्यत्त्वही कायम अबाधित राहील असे नसते. परक्याचे धन या संकल्पनेतच तिची वाढ होते. स्त्रिने कायम आश्रित, परांवलंबी रहावे, यासाठी विशेष संस्कार केले जातात. याचा परीणाम स्त्रियांवर जितका होतो त्यापेक्षा कित्येक पटीने पुरुषांवर होतो.

संबंधित - मनसेच्या महिला नेत्याने लिहिलं समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालंणार पत्र!

घरातील स्त्री आपली आज्ञाधारक तर घराबाहेरची स्त्रीही आपलेच ऐकणारी असावी, हा अट्टाहास त्यात रुजतो. यामुळे त्याला नकार देणारी, त्याच्या वाटेवर न चालणारी स्त्री त्याचे पुरुषत्त्व दुखावणारी ठरते. याच स्त्रीचे अस्तित्त्व तो संपवून टाकतो. तिच्या देहाची विटंबना करतो. कधी पेट्रोल तर कधी असिडने तिला नष्ट करु पाहतो. तिला शिक्षा देतो. ही शिक्षा कुठल्याही एका स्त्रीला नसते. पुरुषत्त्वाच्या भावना, पितृसत्तेच्या व्यवस्थांना नकार देणाऱ्या स्त्री जातीला ही शिक्षा असते. यातून एका महिलेचा जीव गेला. एखाद्या गुन्हेगार पुरुषाला शिक्षा झाली, तरी समाजाला चालते. कारण पुन्हा एकदा हा विजय पितृसत्तेचाच असतो. म्हणुनच स्त्रीला काल पतीच्या निधनानंतर सती जायला भाग पाडणारी पितृसत्ताक व्यवस्था आज तिला भर रस्त्यात जाळायलाही मागे पुढे पाहत नाही.

हेही वाचा - आई-बापाविरोधात मुलगी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली, तिथेच आईने घेतले पेटवून!

जागतिक आर्थिक मंचचा ग्लोबल जेंडर गॅप रिर्पोट - 2020 नुकताच जाहीर झाला आहे. यात लैंगिक समानता म्हणजे पुरुष आणि महिलांमधील अंतराच्या बाबतीत भारताचे स्थान 112 व्या क्रमांकावर आहे. लैंगिक असमानता संपवण्यासाठी भारताला 108 वर्षे लागतील, असेही अहवाल नमूद करतो. या स्थितीचा आणि भारतात जगणाऱ्या महिलांच्या समस्यांचा मोठा निकटचा संबंध आहे. रोज पितृसत्तेचे चटके सहन करत जगणाऱ्या लाखो अबला कुठल्याही पीडितेइतक्याच व्यथित आहेत. स्त्री म्हणून जगण्याचा शाप त्या भोगत आहे. फक्त शिक्षण, राजकारणातला सहभाग अथवा नोकरी करण्याचे स्वातंत्र्य समानतेची बीज रोवू शकत नाही. गरज आहे लिंगभाव समानतेची मुल्ये रुजवण्याची, पितृसत्तेतून निर्माण झालेल्या पुरुषत्वाच्या भ्रामक कल्पना तोडण्याची आणि स्त्रिला व्यक्ती म्हणून स्वीकारण्याची, तिच्या निर्णय स्वातंत्र्याचा आदर करण्याची. तेव्हाच राष्ट्राला काळिमा फासणाऱ्या अशा निंदनीय घटनांना आळा बसेल.

पुण्यात छपाक? अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी देऊन पुण्यात मुलीवर लैंगिक अत्याचार

First published: February 10, 2020, 7:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading