गोविंद वाकडे, पुणे 10 फेब्रुवारी : हिंगणघाट पीडितेच्या मृत्यूनंतर समाजातल्या सर्वच थरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय. आरोपीला तातडीने कठोर शिक्षा करा अशीही मागणी होतेय. एकतर्फी प्रेम प्रकरणातून विकेश नगराळे या तरुणाने प्राध्यापक तरुणीला पेट्रेल टाकून जिंवत जाळण्याचा प्रयत्न केला होता. सात दिवसानंतर आज (सोमवार) तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री मकरंद अनासपुरे यांनीही आपल्या संतप्त भावना व्यक्त करत आरोपीला तातडीने शिक्षा करण्याची मागणी केलीय.
ते म्हणाले, निर्भया प्रकरणातल्या आरोपींच्या फाशीची अंमलबजावणी अजुन झालेली नाही. महिलांवरचे अत्याचार काही थांबत नाही. कारण आरोपींना कायद्याचा धाकच उरलेला नाही. त्यामुळे अशी परिस्थिती राहणं हे निकोप समाजासाठी चांगली नाही त्यामुळे त्या आरोपीला तातडीने कठोर शिक्षा झाली पाहिजे.
असं झालं नाही तर समाजाला हैदराबाद एन्काउंटरसारख्या घटनांचं समर्थन करण्याची वेळ येऊ देऊ नका अशी हात जोडून विनंती आहे असंही ते म्हणाले. सर्वच पक्षांचे नेते आणि सामाजिक नेत्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत कठोर शिक्षा दिली पाहिजे असं मत व्यक्त केलंय.
अतिशय दुःखद..! अखेर हिंगणघाट प्रकरणातील युवतीचा मृत्यु झाला.या प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात होतेय.पिडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी ही विनंती.या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली.तिच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.
— Supriya Sule (@supriya_sule) February 10, 2020
गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेली हिंगणघाटच्या पीडितेची झुंज अखेर आज संपली. सकाळी 6.55 मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला. नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. हे वृत्त हिंगणघाटमध्ये पोहोचताच लोकांमध्ये संतापाची एकच लाट उसळली. प्राध्यापिका असलेली पीडिता उपचारानंतर बरी होई अशी लोकांना अपेक्षा होती. ज्या क्रुरपणे विकेश नगराळे या आरोपीने तिला जाळलं होतं त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप होता. हा संताप आता आणखी वाढला असून आरोपीला लोकांच्या स्वाधीन करा अशी मागणी पीडित प्राध्यापिकेच्या वडिलांनी केलीय.
हिंगणघाट प्रकरणातल्या निरपराध मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.तिला भावपूर्ण श्रद्धांजली! ही घटना महाराष्ट्राच्या मातीसाठी अतिशय लाजीरवाणी आहे.अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकार अधिक संवेदनशीलपणे गुन्हेगारांविरूद्ध कठोर कारवाई करेल.मी तिच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 10, 2020
ते म्हणाले, निर्भया प्रकरणात एवढी वर्ष होऊनही आरोपींना फाशी झालेली नाही. आता तरी असं होऊ नये. त्या आरोपीला आमच्या स्वाधीन करा. तिला जसा त्रास झाला तसाच त्रास त्यालाही झाला पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया तिच्या वडिलांनी दिलीय.
ती आपल्यातून निघून गेली असली तरी तिच्या मारेकर्याला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी. पुन्हा कोणत्या युवतीला अशा दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागणार नाही, अशी अद्दल त्याला घडली पाहिजे, अशी मागणी राज्य सरकारकडे आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 10, 2020
पीडितेला नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी 6.55 मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून तिची मृत्यूशी झुंज सुरू होती. आज सकाळी 7.40 मिनिटांनी हिंगणघाट पीडितेच्या मेडिकल बुलेटिनमध्ये डॉक्टरांनी याबाबतची माहिती दिली. डॉक्टरांकडून तिला वाचविण्यासाठी पूरेपूर प्रयत्न केले जात होते. मात्र आज सकाळी तिच्या ह्रदयाचे ठोके कमी झाले होते त्यातच तिचा दुर्देवी मृत्यू झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Makarand anaspure