मुंबई, 2 सप्टेंबर : राज्यात सध्या गणेशोत्सव दणक्यात सुरू असला तरी राजकीय पक्षांचं लक्ष्य आतापासूनच दसऱ्याकडे (Dasara Melava) लागलं आहे. शिवाजी पार्कवरच्या दसरा मेळाव्यावरून आतापर्यंत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात स्पर्धा सुरू असतानाच यात आता राज ठाकरेंची (Raj Thackeray) एण्ट्री झाली आहे. मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केलेल्या ट्वीटमुळे या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून येऊ शकतात, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. राज ठाकरेंना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यासाठी शिंदे गट जोरदार प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे.
दसऱ्याच्या मुहूर्तावरच सीमोल्लंघन?
शिवसेना कुणाची तसंच एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर असलेली कारवाईची टांगती तलवार, पक्षांतरबंदी कायदा ही सगळी प्रकरणं सध्या सुप्रीम कोर्टात आहेत. सुप्रीम कोर्टाचा निकाल जर एकनाथ शिंदे यांच्याविरोधात गेला तर त्यांना आमदारांसह दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल, अशात त्यांच्यासाठी मनसे हा पर्याय असू शकतो, त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावरच शिंदे आमदारांसह सीमोल्लंघन करणार का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
काहीच दिवसांपूर्वी राज ठाकरेंना एकनाथ शिंदेंना त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांसोबत तुमच्या पक्षात घेणार का? असा प्रश्न राज ठाकरेंनाही विचारण्यात आला होता, तेव्हा असा कोणताही प्रस्ताव माझ्यापुढे आलेला नाही, जेव्हा येईल तेव्हा बघू, असं उत्तर दिलं होतं.
राज ठाकरे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणार? संदीप देशपांडेंचं सूचक ट्विट
संदीप देशपांडे यांची मागणी
मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनीही राज ठाकरेंनी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कच्या शिवतिर्थावर भाषण करावं अशी मागणी केली आहे. दसऱ्याला आपण वंदनीय हिंदुहृदयसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर कडवी निष्ठा असणाऱ्या प्रत्येक हिंदूला, प्रत्येक मराठी मार्गाला मार्गदर्शन करावे,", असं आवाहन संदीप देशपांडे यांनी केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cm eknath shinde, Raj Thackeray, Shivsena, Uddhav Thackeray