मुंबई, 2 सप्टेंबर : शिवसेना आणि शिवसेनेचा दसरा मेळावा हे एक वेगळं समीकरण आहे. दरवर्षी दसरा मेळाव्याच्या दिवशी शिवसेनेकडून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर भव्य सभेचं आयोजन करत शक्ती प्रदर्शन केलं जातं. पण यावर्षी वातावरण वेगळं आहे. शिवसेनेतील अनेक दिग्गज नेत्यांनी बंडखोरी करुन भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ही बंडखोरी करण्यात आली आहे. या बंडखरी नंतर शिवसेनेचा बंडखोर गटदेखील दसरा मेळाव्याबद्दल विविध दावे करताना दिसत आहे. एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी काल याबाबत विधान केलं होतं. एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घ्यावा, असं विधान रामदास कदम यांनी केलं. त्यानंतर आज मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सूचक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दसरा मेळावा घेण्याचं आवाहन केलं आहे. अतिशय सूचक असं हे ट्विट आहे. “बाळासाहेब ठाकरे यांचे आम्हीच खरे वारसदार असं म्हणत ‘यू टर्न’ आणि ‘बंडखोर’ असे दोन्ही गट शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची भाषा करत आहेत. लक्ष लक्ष मराठीजनांसमोर हिंदुत्वाचं अग्निकुंड धगधगते ठेवण्यासाठी ज्वलंत भाषण करण्याची क्षमता त्यापैकी कुणातच नाही. ज्या दसरा मेळाव्यासाठी राज्यातील मराठी भूमिपूत्रविरोधी आणि देशभरातील हिंदूविरोधी राजकीय पक्षांना धडकी भरायची, तोच दसरा मेळावा आज राजकीय चेष्टाचा विषय ठरत आहे, याहून मोठी शिकांतिका ती कोणती?”, असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला. “वंदनीय कै. बाळासाहेब ठाकरे आणि शि व से ना या चार अक्षरांवर प्रेम करणारा, त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणारा प्रत्येक मराठी आणि हिंदू व्यथित झाला आहे, गोंधळला आहे. त्याच्या मनातला हा गोंधळ दूर करणं अत्यंत गरजेचं आहे. हिंदूंची मरगळलेली मनं पुन्हा एकदा चेतवण्याचे, मराठीजनांचा मानसिक गोंधळ दूर करण्याचे कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता असलेली एकमेव व्यक्ती या महाराष्ट्रात आहे, ती म्हणजे आपण. हिंदूजननायक श्रीमान राजसाहेब ठाकरे! म्हणूनच कोट्यवधी हिंदू तसंच मराठीजनांच्या वतीने आमच्यासारख्या लक्षावधी हिंदवी रक्षकांची, महाराष्ट्र सेवकांची आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे की, दसऱ्याला आपण वंदनीय हिंदुहृदयसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर कडवी निष्ठा असणाऱ्या प्रत्येक हिंदूला, प्रत्येक मराठी मार्गाला मार्गदर्शन करावे,”, असं आवाहन संदीप देशपांडे यांनी केलं. “दसऱ्यानिमित्ताने शिवतीर्थावर आपल्या परखड, रोखठोक ठाकरी शैलेतील वकृत्वाच्या तेज:पुंज अविष्काराची - जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनिंनो आणि मातांनो… या हाकेचा महाराष्ट्र आणि अवघा हिंदुस्थान आतुरतेने वाट पाहत आहेत”, असंदेखील देशपांडे पत्रात म्हणाले.
महाराष्ट्र सैनिकांचे मनोगत pic.twitter.com/4zUv4uuTwL
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 2, 2022
दरम्यान, रामदास कदम यांनी देखील याबाबतचं एकनाथ शिंदेंना उद्देशून विधान केलं होतं. ‘बाळासाहेबांचे विचार घेऊन एकनाथ शिंदे चालले आहेत, तर शरद पवारांचे विचार घेऊन उद्धव ठाकरे चालले आहेत. बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी करण्याचं काम, त्यांच्या विचारांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत. मग त्यांना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा आणि विचार सांगण्याचा अधिकार कुठून आला? त्यामुळे एकनाथ शिंदेंनी दसरा मेळावा घ्यावा आणि शिवसेनेप्रमुखांचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवावेत, असं माझं वैयक्तिक मत आहे, हे मत मी एकनाथ शिंदेंसमोर मांडणार आहे’, असंही रामदास कदम यांनी सांगितलं.