मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्योतिषाकडे गेले असा आरोप विरोधकांकडून होत आहे. यावरून शरद पवार यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. आता या टीकेला शिंदे गटाचे नेते मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी यावरून शरद पवार यांना टोला लगावला आहे. देवाच्या दर्शनाला गेलेल्या मुख्यमंत्र्यांना हात दाखवायला गेले असे म्हणणे चुकीचे आहे. मुख्यमंत्र्यांनी गो शाळेला मदत केली. त्या ठिकाणी भेट देत त्यांनी शंकराचं दर्शन घेतलं असं केसरकर यांनी म्हटलं आहे. शरद पवारांना टोला दरम्यान त्यांनी यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला आहे. पवारसाहेब कधी मंदिरात जात नाहीत, त्यांना गो शाळेबद्दल आत्मीयता नाही. शरद पवारांना मंदिराबाबत आणि गो शाळेबाबत द्वेष आहे, हेच यावरून दिसून येते. ज्योतिष शास्रबद्दल असा शब्द वापरणे दुर्दैवी आहे. शरद पवार हे माझे नेते पण राजकीय आरोप झाल्यास उत्तर देणार असा घणाघात दीपक केसकर यांनी केला आहे. ज्योतिष ही भारताची परंपरा पुढे बोलताना केसरकर यांनी म्हटलं आहे की, धर्माच्या नावावर मते मागायची आहेत म्हणून तुम्हाला हे सुचते. आम्हाला मंदिरात जायला कमीपणा वाटत नाही. आम्ही हिंदुत्व दडून ठेवत नाहीत. ज्योतिष ही भारताची परंपरा आहे, ती जपली पाहिजे. कामाख्या देवीच्या कृपेने सत्तेत शिंदे गटाचे सर्व आमदार आणि मंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहेत. यावर देखील केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कामाख्या देवीच्या दर्शनाने आम्ही सत्तेत आलो. चुकीच्या सरकारमधून आम्ही बाहेर पडलो. कामाख्या देवीच्या कृपेने लोकांनी निवडून दिलेले सरकार आणले. त्यामुळे आम्ही आता कामख्या देवीचा आशीर्वाद घेऊन कामाला सुरुवात करणार आहोत. आम्ही येत्या 26 तारखेला देवीच्या दर्शनासाठी जात आहोत असं केसरकर यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.