ठाणे, 18 मार्च : सध्या अनिक्षा जयसिंघानी प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहेय. डिझायनर असलेल्या या तरुणीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यानंतर या तरुणीविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अनिक्षा जयसिंघानी ही बुकी अनिल जयसिंघानीची मुलगी आहे.
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
आता या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. अनिल जयसिंघानी प्रकरणात तपास सुरू आहे. हा अनिल जयसिंघानी महाविकास आघाडीमधील सर्व पक्ष फिरला आहे. त्याची चौकशी होईल. या प्रकरणाच्या पाठिशी कोण आहे? याचा शोध घेतला जाईल. राजकारणात एवढ्या खालच्या पातळीला जावू नये, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते अंबरनाथमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
काय आहे नेमकं प्रकरण?
डिझायनर अनिक्षा जयसिंघानीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपये लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तिला अटक करण्यात आली आहे. आपल्या वडिलांना एका चुकीच्या गुन्हेगारी प्रकरणात अडकवण्यात आलं आहे, त्यांना त्या प्रकरणातून सोडवण्याची मागणी अनिक्षा जयसिंघानीने अमृता फडणवीस यांच्याकडे केली होती. एवढंच नाही तर अमृता यांना धमकी देखील देण्यात आली होती. या प्रकरणात वीस फेब्रुवारी रोजी अमृता फडणवीस यांनी अनिक्षा आणि तिचे वडील अनिल जयसिंघानीविरोधात मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.
कोण आहेत अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी? ज्यांनी थेट अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केला
अमृता फडणवीस यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गुरुवारी या प्रकरणात अनिक्षाला चौकशीसाठी डीबी मार्ग पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं होतं, चौकशीनंतर तिला अटक करण्यात आली. अनिक्षा आणि तिच्या वडिलांवर मुंबई पोलिसांनी भादवीच्या 120 ब अतंर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Shiv sena