मुंबई, 24 ऑगस्ट : मुंबई महापालिका सुधारणा विधेयक (BMC Ward Restructuring Bill) आज विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलं, या विधेयकामुळे आता मुंबई महापालिकेच्या वॉर्डची संख्या पुन्हा एकदा 227 एवढी होणार आहे. महाविकासआघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) असताना मुंबई महापालिका वॉर्डची संख्या 227 वरून 236 करण्यात आली होती. शिवसेनेने आपल्या फायद्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप भाजपसह काँग्रेसनेही केला होता. आता शिंदे सरकारने हे विधेयक मंजूर करताना काँग्रेसनेही पाठिंबा दिला. सरवणकरांचा गौप्यस्फोट दरम्यान आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी वॉर्ड पुनर्ररचनेवरून खळबळजनक आरोप केले. वॉर्ड बदलण्याचा सर्वात पहिला फटका मला बसला. मी यासंदर्भात शिंदे साहेबांना भेटलो. त्यांना बोललो की माझा अर्धा दादर तोडून वरळीला जोडलं गेलं. मला सांगण्यात आलं कोर्टात जायच नाही. मी काय करायचं होतं? हे वॉर्ड तोडत असताना अर्थिक व्यवहार झाले. या सर्व प्रकरणाची एसीबी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी सरवणकर यांनी केली. सदा सरवणकर यांची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मान्य केली, तसंच या प्रकरणाची एसीबीमार्फत चौकशी केली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. नितेश राणेंनी डिवचलं दरम्यान या विधेयकाबाबत बोलताना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याबाबत भाष्य केलं. ‘अध्यक्ष महोदय आपण मला कायद्याबाबत शिकवलं आहे. आपण एकत्र कायद्याचा अभ्यास केला आहे,’ असं वक्तव्य केलं. आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यावरून नितेश राणेंनी (Nitesh Rane) त्यांना डिवचलं. अध्यक्ष महोदय तुम्ही जेव्हा शिकवत होता तेव्हा विद्यार्थ्याचं लक्ष नव्हतं, असा टोला नितेश राणेंनी लगावला. ‘शिवाजी पार्कमध्ये उभं राहून मी मर्द आहे, हे बोलणं सोपं आहे, पण आता कशी फडफड होत आहे, हे आपण बघतोय,’ अशी टीका नितेश राणेंनी केली. राणेंच्या या टीकेला सुनिल प्रभू यांनी उत्तर दिलं. आम्ही अजिबात घाबरत नाही. कधीही मुंबईच्या निवडणुका घ्या, आम्ही लढायला तयार आहोत, असं सुनिल प्रभू म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.