पालघर, 22 सप्टेंबर : भाजपकडून विविध पक्षातील नेत्यांचे इनकमींग सुरूच आहे. मागच्या दोन महिन्यांपूर्वी सत्ता पालट झाल्यानंतर शिवसेनेतील काही नेते भाजपमध्ये जात आहेत तर काही नेते शिंदे गटात सामील होत असताना दिसत आहेत. (BJP, Shiv Sena Palghar) दरम्यान पालघरमध्ये शिवसेनेसह शिंदे गटाला मोठे खिंडार पडले आहे. पालघरमधील शिवसेनेचे दोन्ही माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये एक शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते होते तर एक मुख्यमंत्री शिंदे गटाचे कार्यकर्ते होते.
दरम्यान हा प्रवेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश पार पडला. त्यामुळे या प्रवेशाची राज्यभर चर्चा होताना दिसत आहे. पालघरमधील शिवसेनेचे अमित घोडा आणि विलास तरे यांनी प्रवेश केला आहे.
हे ही वाचा : महाराष्ट्रावर ‘ईडी’च्या लुटारू फौजा म्हणून गुंतवणूकदारांची पळापळ सुरू, शिवसेनेचा फडणवीसांवर निशाणा
शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे विलास तरे यांनी भाजपत प्रवेश केला. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश केल्याने जोरदार चर्चा रंगली आहे. माजी आमदार विलास तरे आणि अमित घोडा या दोघांनीही पालघर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. विलास तरे हे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. 2009 आणि 2014 साली विलास तरे हे बहुजन विकास आघाडीकडून बोईसर विधानसभेवर निवडून आले होते. दरम्यान, 2019मध्ये निवडणुकीआधी तरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.
शिवसेनेच्या पालघरमधील अंतर्गत वादामुळे तरे यांचा पराभव झाला अशी चर्चा आहे. बोईसर विधानसभा मतदारसंघातून 2019 साली निवडणूक लढवताना विलास तरे यांना हार पत्करावी लागली. तेव्हापासून तरे अस्वस्थ होते आणि ते शिंदे गटात जातील, अशी चर्चा सुरु होती.
दुसरीकडे शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा हे दिवंगत आमदार कृष्णा घोडा यांचे सुपुत्र आहे. ते 2016 साली झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून पालघर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. पण 2019 साली विधानसभा निवडणुकीसााठी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती.
हे ही वाचा : बंगला वाचवण्यासाठी राणेंची दिल्लीत धाव, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
अमित घोडा आणि विलास तरे यांची भाजपात प्रवेश केल्याने पालघरमध्ये भाजपला बळ मिळाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. पालिका निवडणुकांच्या आधी घडलेला हा पक्षप्रवेश मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे.

)







