जालना, 26 ऑक्टोबर: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर तोफ डागली. जालना येथे राज्यस्तरीय मराठा आरक्षण जागर परिषदेत छत्रपती संभाजी राजे बोलत होते. यावेळी आमदार नरेंद्र पाटील देखील उपस्थित होते. ओबीसी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती समाजही माझाच आहे. मला त्यांच्याशीही बोलायचं आहे. पण मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे. मला मराठा आणि बहुजन समाजाचा शिपाई व्हायचं आहे, असं खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं. हेही वाचा… ऑनलाईन दसरा मेळावा पडला महागात! पंकजा मुंडेंसह भाजप नेत्यांवर गुन्हा दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवायचा आहे. मात्र पानीपत होऊ द्यायचा नाही, असा सल्ला देखील संभाजी राजे यांनी मराठा कार्यकर्त्यांना दिला. आपला राज्य सरकारच्या समितीवर पूर्ण विश्वास आहे. मात्र, दगाफटका केल्यास सोडणार नाही, असा सज्जड इशारा देखील संभाजी राजे यांनी सरकारला दिला. खासदार संभाजी राजे छत्रपती म्हणाले, आरक्षण मला नको तर 85 टक्के गरीब मराठ्यांना हवं आहे. शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदार आणि 18 पगड जातींना घेऊन स्वराज्याची स्थापना केली. 200 वर्षांनंतर छत्रपती शाहू महाराजांनी देखील वंचितांना आरक्षण दिलं. मग आता मराठा समाज बहुजनातून बाहेर का? वंचितांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र मराठा समाज मागासलेला सिद्ध होऊन देखील त्यांच्या आरक्षणाला विरोध का? आता फक्त एकच लक्ष्य ठेवायचा तो म्हणजे हक्काचा SEBC आरक्षण टिकविणे, असं संभाजी राजे यांनी सांगितलं. मराठा आरक्षणावर उद्या कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे काय जोर लावायचा तो लावा आणि हे आरक्षण टिकवा, समाजाला न्याय मिळाला पाहिजे, अशी राज्य सरकार आणि आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना माझी विनंती आहे, असंही संभाजी राजे यावेळी म्हणाले. मला नको तर माझ्यापेक्षा हुशार लोक मराठा समाजात आहे. त्यांना सारथीवर घ्या, सारथीला भरघोस निधी द्या, अशी मागणी संभाजी राजे यांनी यावेळी केली. ओला दुष्काळ जाहीर करावा, तरच… परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास देखील हिरावून घेतला आहे. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांचा अंत पाहू नये. सरकारनं राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी संभाजी राजे यांनी केली. राज्यात ओला दुष्काळ जाहीर झाल्याशिवाय केंद्रीय मदत व कर्ज मिळणार नाही, असंही खासदार संभाजी राजे यांनी यावेळी सांगितलं. हेही वाचा… राष्ट्रवादीत जाताच ‘चॉकलेट’वरून एकनाथ खडसेंनी केला चंद्रकांत पाटलांवर पलटवार आ. नरेंद्र पाटील यांची खोचक टीका… दरम्यान, खासदारकी मिळाली नाही म्हनून आता विधान परिषदेच्या वर्णीसाठी काही मराठा नेते मराठा समाजाच्याच विरोधात उभे राहत आहेत, अशी खोचक टीका आमदार नरेंद्र पाटील यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.