नागपूर, 29 नोव्हेंबर: भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला राजकीय 'अल्झायमर' म्हणजेच 'स्मृतिभ्रंशाचा आजार' झाला असल्याची सणसणीत टीका देखील मुनगंटीवार यांनी केली आहे. अमित शाह, शरद पवार यांच्यात बैठक झाली होती का, यावर तेच दोघे बोलू शकतात. संजय राऊत हे शरद पवार यांचे वकीलपत्र का घेतात, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांनी फटकारलं.
हेही वाचा...एकनाथ खडसे दोन दिवसांत करणार मोठा खुलासा, कुणाची नावं येणार समोर?
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं आरक्षण दिलं होतं. मात्र, महाविकास आघाडी सरकारला ते कोर्टात टिकवता आले नाही. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले जे म्हणाले ते एका राजाचं नाही तर राज्यातील एका सामान्य नागरिकाचं मत आहे, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.
सुप्रिया सुळे पंतप्रधान मोदींना कसे बाहेरचा संबोधू शकतात. ते कोट्यवधी भारतीयांना कुटुंब मानतात. ते बाहेरचे कसे होतील, असा सवाल देखील मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांना केला आहे.
वर्षभरातच जनतेचा विश्वासघात...
राज्यातील ठाकरे सरकारला सत्तेवर येऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे. यावरूनही मुनगंटीवार यांनी निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकारनं वर्षभरात जनतेचा विश्वासघात केला आहे. सरकारने राजकीय अल्झायमरचे औषध घ्यावे, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला आहे. या आजाराचा उपाय मतपेटीत असून जनताच जागा दाखवेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
अमित शहा आणि शरद पवारांबाबत काय म्हणाले होते संजय राऊत?
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'च्या 'रोखठोक' सदरात पहिल्यांदाच संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापनेचा घटनाक्रम मांडला. तसेच महाविकास आघाडीमध्ये काही आमदार नाराज असल्याचेही त्यांनी कबूल केलं आहे. संपूर्ण बहुमताचे सरकार असले तरी त्यात नाराज असतातच आणि इथे तर तीन पक्षांचे आघाडी सरकार आहे. मंत्र्यांची व काही आमदारांची नाराजी व्यक्तिगत मानपानाची आहे. ती मुख्यमंत्र्यांनाच दूर करावी लागेल, असंहा राऊत म्हणाले.
पहाटेच्या शपथविधीपूर्वी शरद पवार, अमित शहा यांच्यात दिल्लीत बैठक झाली, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. या बैठकीत पहाटेच्या शपथविधीचे 'नाट्य' तयार झाले हे सर्वस्वी चूक आहे. अमित शहा यांच्या घरी एक बैठक झाली. त्यात एक बडे उद्योगपती व राष्ट्रवादीचे नेते असावेत. पवार या काळात दिल्लीत असताना त्यांच्यात व माझ्यात उत्तम संवाद होता व जवळ जवळ रोजच आम्ही भेटत होतो. नक्की कोठे काय सुरू आहे याचे 'अपडेटस्' एकमेकांना देत होतो. भारतीय जनता पक्षाशी कोणतेही डील करण्याच्या मनःस्थितीत मला शरद पवार दिसले नाहीत.
हेही वाचा...उर्मिला मातोंडकर खेळणार राजकारणात दुसरी इनिंग, शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता
'भाजपकडून सरकार बनविण्यासंदर्भात विविध स्तरांवरून ऑफर्स येत आहेत' हे त्यांचे सांगणे होते. 'लवकरच पंतप्रधान मोदी यांना भेटून मी भाजपबरोबर सरकार स्थापन करणे शक्य नाही असे सांगणार आहे', हे त्यांनी मला सांगितले. याच काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पवार मोदींना भेटायला गेले व महाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबत सांगायचे ते सांगून आले. त्यामुळे पवारांनी भाजपला शब्द दिला होता व त्यानुसार पहाटेच्या हालचाली झाल्या हे खोटेच आहे' असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीस यांचा दावा खोडून काढला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah, Maharashtra, Sanjay raut, Sharad pawar, Sudhir mungantiwar