चिपळूण, 13 मार्च : राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बदली घोटाळ्याचा आरोप केला होता. या प्रकरणाच्या संबंधित काही माहितीही त्यांनी केंद्रीय गृहसचिवांना दिली आहे. याच प्रकरणात त्यांना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एक नोटीस पाठवली आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावल्याने महाराष्ट्रात भाजप नेते, कार्यकर्ते आक्रमक झाले असून राज्यभरात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसवर माजी खासदार निलेश राणे (Former MP Nilesh Rane) यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे-पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
निलेश राणे म्हणाले, ठाकरे सरकार इतकं बावचळलं आहे आणि बिनडोक काम करत आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाहीये. ठाकरे सरकारने देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली आहे. त्यांना वाटतं की ते घाबरतील पण फडणवीस साहेब कुणाला घाबरणारी व्यक्ती नाहीये. आज देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे ठाकरे सरकार अडचणीत आलं आहे. शरद पवार साहेबांना आज लोक प्रश्न विचारत आहेत. ठाकरे सरकार अडचणीत आल्याने बावचळलं आहे.
निलेश राणे पुढे म्हणाले, आज माझ्यावरही केस झाली आहे. की, मी शरद पवार साहेब हे दाऊदची व्यक्ती आहेत असा माझा संशय आहे हे बोलल्यामुळे माझ्यावरही मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. अशा कितीही केसेस देवेंद्र फडणवीस साहेबांवर झाल्या तरी काही फायदा नाही. देवेंद्र फडणवीस फार मोठे आहेत या सर्वांना पुरुन उरतील. असे कितीतरी ठाकरे, कितीतरी पवार हे फडणवीस साहेब खिशात घेऊन फिरतात. केसेसमुळे त्यांना काहीही फरक पडत नाही. या सर्वांना गुंडाळणार कोण तर फडणवीस साहे. अशा कितीतरी केसेस देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवर केल्या तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही.
मुंबई पोलिसांची देवेंद्र फडणवीसांना नोटीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील अधिकाऱ्यांचा बदली घोटाळा मी उघडकीस आणला होता. दिल्लीत केंद्रीय गृहसचिव यांना मी सगळी माहिती सादर केली. कोर्टानं त्याचं गांभीर्य ओळखून CBI ला चौकशी करण्याचे आदेश दिले. ऑफिशियल सीक्रेट माहिती लीक कशी झाली याचा FIR महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केला. ऑफिशिअल सीक्रेट अॅक्ट नुसार राज्य सरकारने गुन्हा दाखल केला आहे. मला पोलिसांनी नोटीस पाठवून प्रश्न विचारले. विरोधी पक्षनेते म्हणून मला माहितीचा स्त्रोत विचारला जाऊ शकत नाही. मला काल CRPC नोटीस मुंबई पोलिसांनी पाठवली. उद्या 11 वाजता BKC सायबर ठाण्यात बोलावलं आहे.
पोलीस चौकशीला सामोरं जाणार
ही सगळी माहिती मी भारत सरकार गृहसचिवांनी दिली आहे. ही माहिती मी बाहेर कुठे बोललो नाही. पण राज्यातील मंत्र्यांनी ही माहिती बाहेर दिली. माझ्याकडे पुरावे आहेत. माझ्या माहितीचा स्त्रोत सांगणं मला बंधनकारक नाहीये. पोलिसांनी चुकीची केस केली असली तरी मी जाणार, पोलिसांना सहकार्य करणार आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबई पोलीस फडणवीसांच्या घरी
मुंबई पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी आज बोलावले होते. मात्र, नंतर मुंबई पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन आम्हीच तुमच्या घरी येऊ तुम्हाला पोलीस स्टेशनला येण्याची आवश्यकता नसल्याचं सांगितलं. त्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी काल सायंकाळी ट्विट केलं. त्यानुसार आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मुंबई पोलिसांची एक टीम देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर दाखल झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Devendra Fadnavis, Nilesh rane, Ratnagiri, Uddhav thackeray, शरद पवार