मुंबई, 20 डिसेंबर: सध्या मुंबईतील मेट्रो कारशेडचा (Mumbai Metro) मुद्यावरून महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. त्यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackeray) यांनी सोशल माध्यमातून जनतेशी संवाद साधताना कांजूरमार्ग येथील प्रस्तावित मेट्रो कारशेडबाबत सरकारची भूमिका मांडली. विरोधकांच्या टीकेलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रत्युत्तर दिलं.
मात्र, मुंबईकरांनी आधीच खूप भोगले आहे. त्यांना आणखी त्रास नको. हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका, ही हात जोडून विनंती आहे, असा खोचक टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांनी मुख्यमंत्र्याना लगावला आहे.
हेही वाचा...मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच भाषण म्हणजे... 'या' भाजप नेत्यानं घेतला समाचार
देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे. श्रेयासाठी काम करणं हा भाजपाचा स्वभाव नाही. पण प्रश्न अपश्रेयाचा जरूर आहे. ते तुमच्या वाट्याला येऊ नये, हीच इच्छा. भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या 30 मिनिटांच्या संवादातून एक बाब प्रकर्षानं जाणवते, ती म्हणजे अजूनही आपण महाविकास आघाडी सरकारच्याच उच्चाधिकार समितीचा अहवाल पूर्णतः वाचलेला नाही. एकदा हा अहवाल सार्वजनिक करा. प्रत्यक्ष स्थिती, भूमिका, वास्तविकता महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल, असा टोला लगावला.
या समितीनेच सांगितले की कांजूरमार्ग येथे कारशेड नेल्यास किती मोठे आर्थिक नुकसान होईल. शिवाय 4 वर्षांचा विलंब वेगळा. कांजूरमार्ग येथे कारशेड करायचे असेल तरी सुद्धा आरेमध्ये बांधकाम करावेच लागेल हे का लपवून ठेवता? असा सवाल देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.
हेही वाचा...होय मी अहंकारी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला भाजपच्या टीकेवर पलटवार
बोगदे तयार करण्याचे काम आरेची जागा डोळ्यापुढे ठेवून करण्यात आले आहे आणि ते जवळजवळ 80 टक्के पूर्ण होत आहे. आता दुसरी कोणतीही जागा निवडली तरी पैसा आणि वेळ दोन्ही वाया जाणार. मुंबईकरांनी आधीच खूप भोगले आहे, त्यांना आणखी त्रास नको. हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका, ही हात जोडून विनंती आहे, असं ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी मेट्रो कारशेडबाबत मांडलेल्या भूमिकेवर रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.