निलेश पवार, प्रतिनिधी
नंदुरबार, 18 सप्टेंबर : महाराष्ट्राच्या राजकीय गोटात कालपासून विविध घडामोडी घडत असून संपूर्ण वातवरण ढवळून निघालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
(CM Uddhav Thackeray) यांनी औरंगाबाद येथे काल केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू होताच आज राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
(Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
(Jayant Patil) हे एकाच गाडीतून प्रवास करताना दिसून आले. दोन्ही नेत्यांना एकत्र पाहून आता विविध तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.
नंदुरबार येथे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि सहकार महर्षी पी के अण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकर्पणाचा कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी सर्वपक्षीय नेते उपस्थित आहेत. याच कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील हे एकाच कारमधून आले. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा एकत्र कार प्रवास पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या.
"...म्हणून त्यांनी मनातली भावना बोलून दाखवली" - देवेंद्र फडणवीस
काल औरंगाबाद शहरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत व्यासपिठावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे होते. आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील नंदुरबार जिल्ह्यात एकाच व्यासपिठावर आहेत. त्या पोठोपाठ आता उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासोबत ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात एकाच व्यासपिठावर दिसलेत. यामुळे राज्याच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी काय...? असा प्रश्न निर्माण करणारी ही वस्तूस्थिती आज दिसतेय. त्यामुळे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा सर्वच पक्षांचे कार्यकर्ते चक्रावलेत. कार्यकर्त्यांना टेबल टेनीसच्या चेंडू प्रमाणे इकडे तकडे पहावं लागतंय अशी भावना निर्माण करणारं चित्र सध्या राज्याच्या राजकारणात पहायला मिळतंय.
नेमकं काय म्हणाले होते मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंचावर भाषण करण्यासाठी आले असता त्यांनी म्हटलं, "व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि भविष्यात एकत्र आले तर भावी सहकारी" असं म्हटल. मुख्यमंत्र्यांनी हे विधान रावसाहेब दानवे यांच्या समोर तसेच त्यांच्याकडे पाहून केल्याने विविध चर्चा रंगत आहेत.
माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल - चंद्रकांत पाटील
दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. झालं असं की, देहूतील एका कार्यक्रमात मंचावरून एकाने माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला. तेव्हा माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल असं म्हणत पाटलांनी सूचक विधान केलं. या विधानामुळं तर्क-वितर्काना उधाण आलं. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या विधानाने शिवसेना-भाजप पुनहा एकत्र येण्याचे संकेत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिवसेना-भाजपची खरंच युती होणार का? संजय राऊतांनी दिलं 'हे' उत्तर
संजय राऊत यांनी म्हटलं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात जे वक्तव्य केलं ते ठाकरे स्टाईल भाषण होते. उद्धव ठाकरेंनी कुठेही म्हटलं नाहीये की, नवीन गठबंधन होईल, सरकार पडेल किंवा आम्ही या सरकारमधून बाहेर पडू. उद्धवजींचे स्पष्ट संकेत आहेत की ज्यांना भावी सहकारी व्हायचं आहे ते आमच्याकडे येऊ इच्छित आहेत. त्यांनी बोट दाखवून, नाव घेऊन सांगितलं आहे आणि ज्या हालचाली राजकारणात दिसत आहेत. विशेषत: चंद्रकांत पाटील यांनी केलेलं वक्तव्य की माजी मंत्री म्हणू नका. याचाच अर्थ असा की, कुणीतरी तिकडे आहे ज्यांना इथे यायचं आहे आणि उद्धवजींनी संकेत दिले आहेत की तुम्ही या. बरेच लोक येऊ इच्छितात असं म्हणत संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला आहे.
हे सरकार पूर्णपणे पाच वर्षे चालणार. शिवसेना शब्दाची पक्की आहे. शिवसेना कधी विश्वासघात करत नाही. शिवसेना पाठीत खंबीर खुपसत नाही. शिवसेना दिलेला शब्द मोडत नाही त्यामुळे हे सरकार पडेल. नवीन गठबंधन होईल या भ्रमात कुणीही राहू नये. कुणाला पतंक उडवत बसायचं असेल तर त्यांनी उडवावी तो पतंग कधी कापायचा हे माम्हाला माहिती आहे असं म्हणत संजय राऊतांनी शिवसेना-भाजप युती होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
अशा पक्षासोबत हातमिळवणी कशी?
संजय राऊत यांनी म्हटलं, ज्या पक्षातील नेत्यांनी शिवसेना भवन तोडण्याची भाषा केली. ज्या पक्षातील लोक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपशब्द वापरतात. कानाखाली मारण्याची भाषा करतात अशा पक्षासोबत हातमिळवणी कशी करू. उद्धवजींनी स्पष्ट सांगितलं आहे की, कुणीतरी इथे येत आहे त्यांचं आम्ही स्वागत करतो.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.