मुंबई, 17 सप्टेंबर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी औरंगाबाद येथील जाहीर कार्यक्रमात भावी सहकारी म्हणत केलेल्या वक्तव्याने तर्क वितर्कांना उधाण आले आहे. या विधानामुळे शिवसेना - भाजपची पुन्हा युती (Shiv Sena - BJP Yuti) होणार असल्याची जोरदार चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) हे मंचावर असताना त्यांच्याकडे पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याच्या संदर्भात वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगत आहेत. उद्धव ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची प्रतिक्रिया आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, त्यांच्या शुभेच्छा… चांगली गोष्ट आहे. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. मात्र, भाजपची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आम्ही सत्तेकडे डोळे लावून बसलेलो नाहीत. आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका करत आहोत. …म्हणून मुख्यमंत्र्यांनी मनातली भावना बोलून दाखवली हे जे काही अनैसर्गिक गठबंधन बनलं आहे ते फारकाळ चालू शकत नाही. मला असं वाटतं कदाचित मुख्यमंत्र्यांच्याही लक्षात आलं असेल की अशा प्रकारचं अनैसर्गिक गठबंधन करुन महाराष्ट्राचं नुकसान होत आहे आणि म्हणून त्यांनी मनातली भावना बोलून दाखवली असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण चंद्रकांत पाटील काय म्हणाले? मुख्यमंत्र्यांच्या विधानावर चंद्रकांत पाटील म्हणाले, मी काय मनकवडा नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात काय सांगू शकणार नाही. नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंचावर भाषण करण्यासाठी आले असता त्यांनी म्हटलं, “व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि भविष्यात एकत्र आले तर भावी सहकारी” असं म्हटल. मुख्यमंत्र्यांनी हे विधान रावसाहेब दानवे यांच्या समोर तसेच त्यांच्याकडे पाहून केल्याने विविध चर्चा रंगत आहेत. माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल - चंद्रकांत पाटील कालच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. झालं असं की, देहूतील एका कार्यक्रमात मंचावरून एकाने माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला. तेव्हा माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल असं म्हणत पाटलांनी सूचक विधान केलं. या विधानामुळं तर्क-वितर्काना उधाण आलं. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या विधानाने शिवसेना-भाजप पुनहा एकत्र येण्याचे संकेत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.