"एकत्र आलो तर भावी सहकारी..." मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

CM Uddhav Thackeray on Shiv Sena BJP Alliance: शिवसेना आणि भाजप यांच्यात पुन्हा युती होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे आणि तो म्हणजे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे.

  • Share this:

औरंगाबाद, 17 सप्टेंबर : औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी असं काही वक्तव्य केलं की ज्यामुळे शिवसेना - भाजपची पुन्हा युती (Shiv Sena BJP Alliance) होणार असल्याची जोरदार चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे हे मंचावर असताना त्यांच्याकडे पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याच्या संदर्भात वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगत आहेत.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंचावर भाषण करण्यासाठी आले असता त्यांनी म्हटलं, "व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि भविष्यात एकत्र आले तर भावी सहकारी" असं म्हटल. मुख्यमंत्र्यांनी हे विधान रावसाहेब दानवे यांच्या समोर तसेच त्यांच्याकडे पाहून केल्याने विविध चर्चा रंगत आहेत.

जाहीर व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या विधानाने आता शिवसेना-भाजपची पुन्हा युती होणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले हे सूचक वक्तव्य आहे का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या कार्यक्रमात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात सुद्धा उपस्थित होते.

"माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल"

कालच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. झालं असं की, देहूतील एका कार्यक्रमात मंचावरून एकाने माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला. तेव्हा माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल असं म्हणत पाटलांनी सूचक विधान केलं. या विधानामुळं तर्क-वितर्काना उधाण आलं. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या विधानाने शिवसेना-भाजप पुनहा एकत्र येण्याचे संकेत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Published by: Sunil Desale
First published: September 17, 2021, 11:56 AM IST

ताज्या बातम्या