औरंगाबाद, 11 फेब्रुवारी: चिंचवड निवडणुकीमधून शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी माघार न घेतल्यानं महाविकास आघाडीच्या मताचं गणित बिघडण्याची शक्यता आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चिंचवड निवडणुकीमध्ये शिवसेनेत बंडखोरी झाली. त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र उपयोग झाला नाही. त्यांच्या मागे कोण आहे हे कळायला मार्ग नाही. हा मतांच्या विभाजनाचा डाव आहे. मात्र आम्ही मतांचे विभाजन होऊ देणार नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एक असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. राज्य सरकारला टोला दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शिंदे, फडणवीस सरकारला देखील टोला लगावला आहे. रत्नागिरीचे पत्रकार वारीशे यांची हत्याच झाली आहे. त्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. आदित्य ठाकरेंवर हल्ला होतोय, प्रज्ञा सातव यांच्यावर देखील हल्ला झाला. मोठ्या माणसांवर हल्ले सुरू आहेत. सरकार काय करतय? गृहविभाग काय झोपा काढत आहे का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. हेही वाचा : चिंचवड पोटनिवडणुकीत मोठं ट्विस्ट; आता ठाकरे गट नाराज, सचिन आहिरांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण! मुख्यमंत्रीपदावर प्रतिक्रिया दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हेच महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत अशी चर्चा सुरू आहे. याबाबत बोलताना शरद पवार यांनी म्हटलं होतं की अनेकांची इच्छा आहे, मात्र संख्याबळ नसल्यानं अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. याबाबत अजित पवार यांना विचारले असता त्यांनी बोलणं टाळळं. वरिष्ठ बोलल्यानंतर आम्ही बोलत नसतो असं त्यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.