लक्ष्मण घाटोळ, (प्रतिनिधी) नाशिक, 22 जुलै: देशात कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे संसदेचं कामकाज पुढे ढकलण्यात आलं होतं. अखेर बुधवारी संसदेचं कामकाज सुरू झालं. राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी आज शपथ घेतली. त्यात महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह भाजपचे नेते उदयनराजे भोसले, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी शपथ घेतली. शरद पवार हे दिल्लीत खासदारकीची शपथ घेत असताना मात्र नाशिक शहरात त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. भारतीय युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करत शरद पवार यांनी राम मंदिरावरून केलेल्या वक्तव्याचा तिव्र निषेध करण्यात आला. हेही वाचा… भाजपच्या आमदाराला कोरोनाची लागण, स्वत: सोशल मीडियावर पोस्ट केला मेसेज राम मंदिर उभारल्याने कोरोना जाईल का, असं मत शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी सोलापुरात व्यक्त केलं होतं. एवढंच नाही तर शरद पवार यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला होता. शरद पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी बुधवारी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ‘जय श्री राम.. चलो अयोध्या’ अशा आशयाचे पत्र पाठवलं आहे. काय म्हणाले होते शरद पवार… ? अयोध्येतल्या ऐतिहासिक राम मंदिराचं भूमीपूजन 5 ऑगस्टला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमीपूजन केलं जाणार आहे. पंतप्रधानांनी राम मंदिर ट्रस्टचं निमंत्रण स्विकारलं आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राम मंदिर भूमीपूजनाच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर खोचक टीका केली होती. कोरोनामुळे देशभरात लागू करण्यात लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान होत आहे. त्याकडे राज्य, केंद्र सरकारने लक्ष द्यायला हवी. मात्र, काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल, अशा शब्दांत शरद पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. आम्हालाही वाटत की कोरोना संपवला पाहिजे. पण कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत. ते दिल्लीत जाऊन या मुद्द्यावर प्रश्न मांडतील, असंही शरद पवार यांनी यावेळी सांगितलं. हेही वाचा… कडक सॅल्यूट! त्याचा ‘काळ’ आला होता पण पुणे पोलिसांनी येऊ दिली नाही ‘वेळ’ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला होता. शहर आणि जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शरद पवार यांना पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांच्या राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या प्रश्नाला उत्तर देतांना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.