मुंबई, 16 ऑक्टोबर : अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत येणारे ट्विस्ट काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. राज ठाकरे यांनी लिहिलेल्या या पत्राच्या टायमिंगमुळे त्यांच्या मनात नेमकं काय आहे, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. राज ठाकरे यांनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर करण्याआधी त्यांची आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट झाली होती, त्याआधी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचीही भेट झाली. आशिष शेलार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीनंतर राज ठाकरेंचं हे पत्र समोर आलं आहे.
आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट-निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना नम्र आवाहन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धोरणात्मक भूमिका.@Dev_Fadnavis pic.twitter.com/78nfA21hDP
— Raj Thackeray (@RajThackeray) October 16, 2022
ऋतुजा लटकेंना बिनविरोध विधानसभेवर पाठवा, असं म्हणत राज ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांना मदतीची भूमिका घेतली आहे. याआधी शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं तेव्हाही राज ठाकरे यांनी त्यांच्या नेते आणि प्रवक्त्यांना कुठेही न बोलण्याचे आणि लिहिण्याचे आदेश दिले होते.
सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये.
— Raj Thackeray (@RajThackeray) October 9, 2022
मी योग्य वेळेस पक्षाची ह्या सगळ्यावर भूमिका मांडेन.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनी घेतलेल्या दसरा मेळाव्यावरही मनसेच्या नेत्यांकडून टीका करण्यात आली होती, तसंच पहिल्यांदाच शिंदेंवर टीका करताना मनसे नेत्यांनी खोके हा शब्दप्रयोग केला होता. दसरा मेळाव्यानंतर बदलला मनसेचा सूर? ‘शिंदे’शाहीवर टीका करताना काढले खोके! मागच्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि भाजपचे नेते यांच्यातल्या भेटीगाठी वाढल्या होत्या. तसंच राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याही भेटी झाल्या. आगामी निवडणुकांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षासोबत मनसेची युती होईल, अशा चर्चाही सुरू आहेत, त्यातच आता राज ठाकरेंनी अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची आग्रही भूमिका मांडली आहे, त्यामुळे राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय चाललंय? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.